इराणवर हल्ल्याची 2 वर्षांपासून तयारी
अमेरिकेने रविवारी सकाळी (भारतीय प्रमाणवेळेनुसार 4.10 वाजता पहाटे) इराणच्या 3 आण्विक तळांवर 7 बी-2 बॉम्बरने हल्ले केले. इराणच्या फोर्डो, नतांज आणि इस्फहानमधील आण्विक तळांना अमेरिकेने उद्ध्वस्त केले आहे. या कारवाईला अमेरिकेने ‘ऑपरेशन मिडनाइट हॅमर’ नाव दिले आहे. यादरम्यान अमेरिकेने फोर्डो आणि नतांजवर 30 हजार पाउंडचे (14 हजार किलो) 12 हून अधिक जीबीयू-57 बॉम्ब (बंकर बस्टर) पाडविले आहेत. तर इस्फहान आणि नतांजवर 30 टॉमहॉक क्रूज क्षेपणास्त्रs डागली आहेत. या क्षेपणास्त्रांना 400 मैल अंतरावरील अमेरिकन पाणबुड्यांमधून डागण्यात आले होते.
या पूर्ण मोहिमेत एकूण 75 प्रिसिशन गाइडेड वेपन्स (अचूक हल्ला करणारी शस्त्रास्त्रs)चा वापर करण्यात आला. तर हल्ल्यात 125 विमानांनी भाग घेतला होता, यात लढाऊ विमाने, रीफ्यूलिंग टँकर्स आणि स्टेल्थ विमाने सामील होती. या मोहिमेसाठी अमेरिकेकडून खास रणनीति करण्यात आली होती. याची तयारी मागील 2 वर्षांपासून केली जात होती. अमेरिकेने हल्ल्यापूर्वी बी-2 बॉम्बर्सना देशाच्या पश्चिम दिशेला तैनात करत भ्रम निर्माण केला आणि इराणला यामुळे हल्ला रोखता आले नाही. इराण हा अमेरिकेच्या पूर्व दिशेला स्थित आहे. यामुळे अमेरिकेने इराणला गाफिल ठेवत यशस्वी कारवाई केली.
2 वर्षांपासून अमेरिकेकडून तयारी
अमेरिकेने 2 वर्षांपासून सुरू असलेल्या तयारीचा सुगावा कुणाला लागू दिला नाही आणि तिन्ही आण्विक केंद्रांविषयी माहिती जमविली. अमेरिका हल्ल्याकरता योग्य संधीच्या प्रतीक्षेत होता. इस्रायल-इराण युद्धादरम्यान ही संधी मिळताच त्याने या केंद्रांवर हल्ले केले आहेत.
कारवाईवरून चकविले
अमेरिकेने हल्ल्याकरता घाई नसल्याचे दाखवत या मोहिमेबद्दल गुप्तता राखली. हल्ल्याच्या दोन दिवसांपूर्वी अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी जाहीर स्वरुपात दोन आठवड्यांमध्ये युद्धावरून कुठलाही निर्णय घेणार असल्याचे म्हटले होते. तर काही बी-2 बॉम्बर्सना जाणूनबुजून अमेरिकेच्या पश्चिम दिशेला पाठविण्यात आले, जेणेकरून हा एक सैन्याभ्यास वाटावा आणि संधी मिळताच खरा हल्ला पूर्व दिशेला म्हणजेच इराणमध्ये करता येईल. हल्ला प्रशांत महासागराच्या दिशेकडून होईल, असे इराणला वाटले होते. परंतु प्रत्यक्षात हल्ला व्हाइट-मॅन वायुतळावरून (मिसौरी) करण्यात आला.
37 तासांपर्यंत बी-2 बॉम्बरचे उड्डाण
हल्ला करण्यापूर्वी बी-2 बॉम्बर विमानाने अमेरिकेच्या मिसौरी व्हाइट-मॅन वायुतळावरून भारतीय प्रमाणवेळेनुसार 20 जून रोजी दुपारी सुमारे 3 वाजून 30 मिनिटांनी टेकऑफ केले होते. या विमानाने जवळपास 37 तासांपर्यंत सलग उ•ाण केले आणि मधल्या काळात आकाशातच अनेकदा इंधन भरले होते. बी-2 बॉम्बरने फोर्डो आणि नतांज स्थळावर 30 हजार पाउंड (14 हजार किलो)च्या 12 हून अधिक जीबीयू-57 बॉम्बना (बंकर बस्टर) पाडविले. तर अमेरिकेने जीबीयू-57 बंकर बस्टर बॉम्बचा पहिल्यांदाच वापर केला आहे.
अमेरिका-इस्रायलदरम्यान ताळमेळ
अमेरिकेच्या हल्ल्यापूर्वी इस्रायलने 9 दिवसांपर्यंत इराणची सैन्यक्षमता मोडून काढली होती. इस्रायलने 21 जून रोजी रात्री देखील इराणवर अनेक हल्ले केले. यामुळे इराण या हल्ल्यांना प्रत्युत्तर देत राहिला आणि अमेरिकेला कारवाईसाठी पुरेसा वेळ मिळाला. तर अमेरिका उघडपणे साथ देत नसल्याचे वातावरण इस्रायलकडून निर्माण करण्यात आले होते.
महिला वैमानिक देखील मोहिमेत सामील
अमेरिकेच्या या मोहिमेत बी-2 वैमानिकांमध्ये एक महिलाही सामील होती अशी माहिती संरक्षणमंत्री पीट हगसेथ यांनी दिली आहे. तर बी-2 विमानांचे हे आतापर्यंतचे सर्वात मोठे आणि दुसरे सर्वात लांब अभियान राहिले आहे. जे केवळ 9/11 नंतर राबविण्यात आलेल्या अभियानानंतर सर्वात मोठे होते.
रडारला करता आले नाही ट्रॅक
अमेरिकेच्या अधिकाऱ्यांनुसार इराणची हवाई सुरक्षा या रणनीतिसमोर अपयशी ठरली. कुठलाही रडार किंवा क्षेपणास्त्र सुरक्षा प्रणालीने या बॉम्बर्स विमानांना ट्रॅक केले नाही. या पूर्ण मोहिमेत 125 विमाने सामील होती, ज्यात लढाऊ विमाने, रिफ्यूलिंग टँकर आणि स्टील्थ विमाने होती.