भारतासोबत सुरक्षा कराराची तयारी
युक्रेनच्या अध्यक्षांची मोठी घोषणा : रशियासोबत सुरू आहे युद्ध
वृत्तसंस्था/ कीव्ह
युक्रेन आणि भारत एक नव्या सुरक्षा सहकार्य कराराला अंतिम रुप देत आहेत अशी घोषणा युव्रेनचे अध्यक्ष वोल्दोमिर झेलेंस्की यांनी केली आहे. दस्तऐवज तयार करता यावेत म्हणून कराराला अंतिम रुप दिले जात असल्याचा दावा झेलेंस्की यांनी केला आहे. भारताचे एनएसए अजित डोवाल आणि विदेशमंत्री एस. जयशंकर यांच्यासोबत युक्रेनचे सुरक्षा सचिव रुस्तम उमेरोव यांच्या उच्चस्तरीय चर्चेच्या काही दिवसांनी ही घोषणा करण्यात आली आहे. आम्ही पुढील आठवड्यात स्वत:च्या भागीदारांसोबत सुरक्षा सहकार्यासंबंधी महत्त्वपूर्ण घोषणांची तयारी करत आहोत. युक्रेनसाठी हवाई सुरक्षा आणि आमच्या सैन्यासाठी समर्थन आमची निरंतर प्राथमिकता ठरली असल्याचे आम्ही विसरत नाही. भविष्यात आणखी सुरक्षा करार होणार आहेत. भारतासोबत आमच्या सुरक्षा सहकार्याचा एक करार पूर्वीपासून अस्तित्वात आहे, असे उद्गार झेलेंस्की यांनी काढले आहेत.
युरोपीय भागीदारांसोबत यापुढेही काम करण्याची तयारी केली जात आहे, जेणेकरून युक्रेनसाठी पूर्वीपासून मान्यता मिळालेल्या सहाय्य पॅकेजला अनब्लॉक करता येईल असेही झेलेंस्की यांनी म्हटले आहे.
युक्रेन-रशिया युद्धावर भारताची भूमिका
युक्रेन मागील 4 वर्षांपासून रशियासोबतच्या युद्धात गुंतलेला असताना भारतासोबतचे त्याचे सुरक्षा सहकार्य वाढत आहे. रशिया हा भारताचा महत्त्वाचा सुरक्षा सहकारी असताना हे घडत आहे. रशिया आणि युक्रेनदरम्यान युद्धावरून भारताने कूटनीति आणि संवादाद्वारे शांततापूर्ण तोडगा काढण्यावर जोर दिला आहे. तर उमेरोव यांच्यासोबत शुक्रवारी झालेल्या चर्चेदरम्यान एनएसए डोवाल यांनी भारताच्या या भूमिकेला स्पष्ट केले आहे.