श्री दुर्गामाता मंदिर कलशारोहणाची तयारी पूर्ण
तासगांव :
तासगांवातील शिवनेरी कला, क्रीडा व सांस्कृतिक मंडळ यांच्या सौजन्याने तासगांव येथे ४ कोटी ६५ लाख रुपये खर्चुन उभारलेल्या श्री दुर्गामाता मंदिर, वास्तुशांत, मूर्ती प्राणप्रतिष्ठापना, कलशारोहण व सहस्त्रचंडी सोहळ्यास रविवार दि. १३ एप्रिल पासून प्रारंभ होत आहे. या सोहळ्याची सर्व तयारी पूर्ण झाली असल्याची माहिती मंडळाच्या वतीने देण्यात आली आहे.
या निमित्त श्री दुर्गामाता मूर्ती व कलश भव्य मिरवणुकीसह इतर मक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. शिवनेरी कला, क्रीडा व सांस्कृतिक मंडळाचे अध्यक्ष कै. अनिल जाधव यांचे श्री दुर्गामाता मंदिर चे स्वप्न होते. त्यांची स्वप्नपूर्ती आता या मंदिर उभारणीने होताना दिसून येत आहे.
दि.१३ एप्रिल ते २५ एप्रिल हा सोहळा होणार आहे. रविवार दि.१३ एप्रिल रोजी दुपारी ३.३० पासून हत्ती, घोडे, उंट, पारंपारिक बादध व भव्य आतषबाजीत श्री दुर्गामाता मूर्ती व कलश भव्य मिरवणुकीचे आयोजन करण्यात आले आहे.या मिरवणुकीत माहेरवासीनी कलश घेऊन सहभागी होणार आहेत. सोमवार दि. १४ धा िएप्रिल ते मंगळवार दि. २२ एप्रिल या कालावधीत सकाळी ८ ते सायंकाळी ५ यावेळेत विविध धार्मिक होणार आहेत.
त्यामध्ये सोमवारी प्रायश्चित होम व उदकशांती, मंगळवारी प्रधान संकल्प, गणेशपुजन, पुण्याहवाचन, नांदीश्राध्द, जलाधिवास, बुधवारी अँग्री स्थापना, देवता स्थापना, नवग्रह होमवहन, गणेशयाग, धान्यधिवास, गुरूवारी सप्तशतीपाठ, होमहवन, दत्त याग, शर्कराधिवास, शुक्रवारी सप्तशतीपाठ, होमहवन, अन्नपूर्णायाग, अक्षताधिवास, शनिवारी सप्तशतीपाठ, होमहवन, सुब्रहमण्यम याग पुष्पधिवास, रविवारी सप्तशतीपाठ, होमहवन, सौरयाग, औषधाधिवास.
सोमवारी सप्तशतीपाठ, होमहवन, शिवयाग, धूपाधिवास व मंगळवारी होमहवन, स्नपनविधी, चंडीयाग, शय्याधिवास असे धार्मिक कार्यक्रम होणार आहेत. २३ एप्रिल रोजी सकाळी ८ ते १० होमहवन, विष्णुयाग, रात्री ८ ते ९.१५ श्री दुर्गामाता मुर्ती प्राणप्रतिष्ठापणा वेदमुर्ति पंडित प्रवर पद्मश्री गणेश्वरशास्त्री द्रविड गुरूजी, काशी तसेच कलशारोहण श्री श्री श्री जगगुरू विदया विश्वेश्वर भारती स्वामीजी (मठाधिपती अविच्छिन्न परम्परा कूडली श्रडेरी महासंस्थानम् चामराज पेट बंगळुरू कर्नाटक ५६००१८) यांचे हस्ते कलशारोहण होणार आहे.तर याच दिवशी रात्री ९.३० वा.श्री महाकाल मल्हारी जागरण गोंधळ पार्टी, सांगली यांचा जागरण गोंधळ कार्यक्रम होणार आहे.
२४ एप्रिल रोजी सकाळी ८ ते ११ बलिदान, पुर्णाहुती, अवभृथ स्नान हा कार्यक्रम प्रधानाचार्य वे. मु. संदीपशास्त्री कुलकर्णी, नागठाणे यांच्या उपस्थितीत होणार आहे. शुक्रवार दि.२५ एप्रिल रोजी सकाळी ८ ते १२ महापूजा व महाआरती होणार असून याच दिवशी दुपारी १२ ते ४ पर्यंत महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे. हा सोहळा तासगांवातील शिवनेरी चौक, ढवळवेस, येथे होत असून श्री दुर्गामाता मंदिर वास्तुशांत मुर्ती प्राणप्रतिष्ठापणा, कलशारोहण, व सहस्त्रचंडी सोहळ्याची सर्व तयारी पूर्ण झाली आहे असे स्पष्ट करून या भव्यदिव्य कार्यक्रमास सर्वांनी उपस्थित रहावे, असे आवाहन शिवनेरी कला, क्रीडा व सांस्कृतिक मंडळाचे मार्गदर्शक संदीप आबा गिड्ढे यांच्यासह मंडळाच्या कार्यकर्त्यांच्या वतीने करण्यात आले आहे.