सरकार पाडण्यासाठी बेळगावातूनच तयारी सुरू
निश्चितच सरकार कोसळणार : विरोधी पक्षनेते आर. अशोक
प्रतिनिधी/ बेंगळूर
मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांना सत्तेवरून खाली खेचण्यासाठी एक टोळी सज्ज झाली आहे. ती डी. के. शिवकुमार यांची टोळी आहे. तर दुसरीकडे शिवकुमार यांना अडकविण्यासाठी सिद्धरामय्या यांनी गृहमंत्री परमेश्वर यांच्या घरी बैठक घेतली आहे. चौघेजण शिवकुमार यांना ख•dयात टाकण्याच्या तयारीत आहे. यापूर्वीचे काँग्रेस-निजद युती सरकार पाडण्यासाठी बेळगावात योजना आखण्यात आली होती. आताही तिथून तयारी सुरू आहे. या सर्व घडामोडी पाहिल्या तर निश्चितच सरकार कोसळणार आहे, असा अंदाज विरोधी पक्षनेते आर. अशोक यांनी व्यक्त केला.
लोकसभा निवडणुकीसाठी भाजप आणि निजदची युती झाली असून कोणाला किती जागा मिळतील हे अद्याप ठरलेले नाही, असेही ते म्हणाले. रविवारी रात्री आर. अशोक यांनी तुमकूर शहरातील सिद्धगंगा मठातील श्री शिवकुमार स्वामीजींच्या समाधीस्थळाला भेट दिली. तसेच मठाध्यक्ष श्री सिद्धलिंग स्वामीजी यांचे आशीर्वाद घेतल्यानंतर पत्रकारांशी ते बोलत होत. आमच्या पक्षाचे राष्ट्रीय नेते आणि निजद सवेसर्वा देवेगौडा कोणाला किती जागा मिळणार, याचा निर्णय घेतील, असे त्यांनी सांगितले.
दुष्काळाचा मुद्दा सर्वप्रथम उचलून धरणार
यापूर्वी आमचा पक्ष 24-25 मतदारसंघात लोकसभा निवडणूक लढवत असे. यावेळी आम्ही सर्व 28 मतदारसंघात कडवी लढत देऊ. यावेळी लोकसभा निवडणुकीत भाजप पुन्हा जिंकेल आणि नरेंद्र मोदी केंद्रात पुन्हा पंतप्रधान होतील, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. 4 डिसेंबरपासून सुरू होणाऱ्या हिवाळी अधिवेशनात दुष्काळाचा मुद्दा सर्वप्रथम उचलून धरणार आहोत. शेतकरी आणि सर्वसामान्य जनतेला होणाऱ्या समस्यांसाठी आम्ही सरकारच्या विरोधात आवाज उठवणार असल्याचे त्यांनी सांगितले.
अशोक यांचे विधान दुर्भावनापूर्ण : परमेश्वर
मुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांनी डी. के. शिवकुमार यांना सत्तेवरून हटवण्याची योजना आखल्याचे विरोधी पक्षनेते आर. अशोक यांचे विधान दुर्भावनापूर्ण आहे. भाजपच्या लोकांना दुसरे काही काम नसल्यामुळे ते फक्त आरोप करत आहेत, असा टोला गृहमंत्री जी. परमेश्वर यांनी लगावला. मुख्यमंत्री सिद्धरामय्या आमच्या घरी येणे आणि मी त्यांच्या घरी जाणे ही नैसर्गिक प्रक्रिया आहे. अशोक म्हंटल्याप्रमाणे, कोणतीही चर्चा झालेली नाही. सरकारवर आरोप करण्याशिवाय भाजपला दुसरे काही काम नाही, असेही ते म्हणाले.