हिवाळी अधिवेशनासाठी तयारी जोमात
विविध रस्त्यांची डागडुजी : स्वच्छतेसह दुभाजकांना रंग
बेळगाव : कर्नाटक विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन डिसेंबर महिन्यात होण्याची शक्यता आहे. त्यामुळे प्रशासनाकडून जय्यत तयारी केली जात आहे. शहरापासून हलगा येथील सुवर्ण विधानसौधपर्यंतच्या रस्त्यावरील ख•s बुजविणे. तसेच दुभाजकाला रंग देणे, रस्त्याची स्वच्छता करणे अशी कामे दिवस-रात्र सुरू करण्यात आली आहेत. नागरिकांनी कोणत्याही नागरी समस्यांबाबत तक्रारी मांडल्या तरी त्याची महिनो न महिने दखल न घेणाऱ्या प्रशासनाला आता मात्र नागरी सुविधांची आठवण झाली आहे. अधिवेशन होणार असल्याने विकासकामे वेगाने राबविली जात आहेत. अधिवेशनादरम्यान येणारे मंत्री, वरिष्ठ अधिकारी यांना शहराचा चांगला चेहरा दिसावा यासाठी हा केविलवाणा प्रयत्न केला जात आहे. प्रत्यक्षात शहरात अनेक समस्या असताना केवळ मंत्री ये-जा करतील त्या मार्गाचीच दुरुस्ती केली जात आहे. राष्ट्रीय महामार्गावरील रस्त्याची स्वच्छता, खचलेल्या रस्त्याचे डांबरीकरण, दुभाजकावरील शोभेच्या झाडांची स्वच्छता, या बरोबरच येडियुराप्पा मार्गावरील ख•s बुजविण्याच्या कामालाही टप्प्याटप्प्याने सुरुवात करण्यात आली आहे. याबरोबरच शहराच्या इतर भागातही स्वच्छतेचे काम हाती घेण्यात आले आहे. मुख्यमंत्री तसेच राज्यपाल यांचे वास्तव्य दरवर्षी व्हीटीयूच्या शासकीय विश्रामगृहात असते. त्यामुळे बेळगाव ते संतिबस्तवाड या मार्गावरही डागडुजीच्या कामाला सुरुवात करण्यात आली आहे.
अधिवेशनाच्या झगमगाटासाठी अनेक गावांमध्ये अंधार
दुरुस्तीच्या नावाखाली विजेचा खेळखंडोबा : हेस्कॉमच्या कारभाराबाबत नाराजी
कर्नाटक विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन डिसेंबर महिन्यात होणार असले तरी याचा फटका आतापासूनच नागरिकांना बसत आहे. सुवर्ण विधानसौधमध्ये सुरळीत वीजपुरवठा करण्यासाठी परिसरातील गावे मात्र मागील आठ दिवसांपासून अंधारात आहेत. दुरुस्तीच्या नावाखाली विजेचा लपंडाव सुरू असल्याने उद्योग, व्यापार पूर्णपणे ठप्प झाल्याने संतापाची लाट पसरली आहे. मागील आठ दिवसांपासून हेस्कॉमकडून सुवर्णसौध परिसरात दुरुस्तीचे काम हाती घेण्यात आले आहे. कोणतीही पूर्वसूचना न देता कधी दिवसभर तर कधी रात्री उशिरापर्यंत वीजपुरवठा बंद केला जात आहे. सोमवारी सकाळी 11 वाजल्यापासून दुपारी 2 वाजेपर्यंत वीज ठप्प झाली होती.
यामुळे हलगा, बसरीकट्टी, खमकारहट्टी, बस्तवाड, कोळीकोप, तारिहाळ, कोंडुसकोप यासह परिसरात विजेच्या समस्या निर्माण झाल्या आहेत. लघू उद्योग विजेवर अवलंबून असल्याने कोणतीही पूर्वसूचना न देता वीजपुरवठा खंडित करण्यात येत आहे. त्यामुळे व्यावसायिकांचे आर्थिक नुकसान होत आहे. कामगारांना कामावर येऊनही विजेअभावी बसून रहावे लागत आहे. दुकाने, हॉटेल, कोल्ड्रींक्स हाऊस, सुतार, लोहार, गिरणी, वाहने दुरुस्ती, गृहनिर्माण या सर्व व्यवसायांना फटका बसत आहे. यामुळे वीजपुरवठा बंद करण्यापूर्वी किमान पूर्वसूचना तरी द्यावी, अशी मागणी नागरिकांतून केली जात आहे. अधिवेशनासाठी स्थानिकांच्या रोजगारावर गदा येत असल्याने हेस्कॉमने याचा विचार करणे गरजेचे आहे.