नवरा रडत होता, खोलीत रक्ताचा सडा;बारामतीत गरोदर महिलेवर लैंगिक अत्याचार करून खून, गुप्तांगावर जखमा
बारामती: बारामती तालुक्यातील पणदरे एमआयडीसी परिसरात गर्भवती महिलेवर लैंगिक अत्याचार करून तिची हत्या केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी माळेगाव पोलिसांनी गणेश रामचंद्र माने (वय २६, रा. पणदरे) याला अटक केली आहे. गुन्हा दाखल झाल्यानंतर अवघ्या दोन तासांत संशयिताला ताब्यात घेण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली.
मृत महिलेचे नाव वैशाली तानाजी पवार (वय ३०) असे आहे. तिची सासू रंजना लक्ष्मण पवार यांनी दिलेल्या फिर्यादीवरून १३ सप्टेंबर रोजी खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला.
घरातील दृश्य पाहून सासूला धक्का
पोलिसांच्या माहितीनुसार, १२ सप्टेंबर रोजी सायंकाळी वैशालीचा पती तानाजी रडत असल्याचे शेजाऱ्यांनी त्याच्या आईला सांगितले. त्यानंतर रंजना पवार यांनी घरी जाऊन पाहणी केली असता वैशाली खोलीत रक्ताच्या थारोळ्यात पडलेली आढळली. घटनेची माहिती मिळताच सहायक पोलिस निरीक्षक कुलदीप संकपाळ यांच्यासह पोलिस पथक घटनास्थळी दाखल झाले.
घटनास्थळाची पाहणी तसेच परिसरातील चौकशी केल्यानंतर पोलिसांना गणेश माने याच्याबाबत माहिती मिळाली. त्याला ताब्यात घेऊन चौकशी केली असता त्याने गुन्ह्याची कबुली दिल्याचे पोलिसांनी सांगितले.
पोलिसांच्या प्राथमिक तपासानुसार, महिलेवर लैंगिक अत्याचार करण्याच्या उद्देशाने आरोपीने तिच्यावर हातोड्याने हल्ला केला. त्यानंतर तिच्यावर जबरदस्तीने लैंगिक अत्याचार केल्याचा आरोप आहे. महिलेने विरोध केल्यानंतर आरोपीने टॉवेलच्या सहाय्याने तिचा गळा आवळून हत्या केल्याचे तपासात समोर आल्याचे पोलिसांनी सांगितले.
शवविच्छेदन अहवालात महिला गर्भवती असल्याचे स्पष्ट झाले आहे. तिच्या डोक्यावर, मानेवर आणि शरीराच्या संवेदनशील भागांवर गंभीर जखमा आढळल्याची माहिती पोलिसांनी दिली.
दागिनेही लुटल्याचे तपासात उघड
घटनेनंतर महिलेच्या अंगावरील सोन्याचे डोरले आणि पैंजण गायब असल्याचे आढळून आले. आरोपीने हे दागिने नेल्याचे तपासात निष्पन्न झाल्यानंतर प्रकरणात जबरी चोरीचे कलमही वाढविण्यात आले आहे. पोलिसांनी आरोपीकडून हातोडा, कपडे आणि दागिने जप्त केले आहेत.
आरोपीला न्यायालयात हजर केले असता १६ सप्टेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. गुन्ह्यामागील अन्य बाबी आणि घटनेचा सविस्तर तपास माळेगाव पोलिसांकडून सुरू आहे.