For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

Satara News | साताऱ्यात गर्भवती मातेने सोडले अंधश्रद्धेचे ग्रहण; ग्रहण काळात केले 'हे' काम

05:00 PM Mar 04, 2026 IST | NEETA POTDAR
satara news   साताऱ्यात गर्भवती मातेने सोडले अंधश्रद्धेचे ग्रहण  ग्रहण काळात केले  हे  काम
Advertisement

                                   साताऱ्यात ‘सोडा अंधश्रद्धेचे ग्रहण

Advertisement

सातारा - चंद्रग्रहणा निमित्त महाराष्ट्र निर्मूलन समितीने 'सोडा अंधश्रद्धेचे ग्रहण' हा अभिनव उपक्रम राबवला. ग्रहण काळात गर्भवती महिलांना ग्रहण पाळण्याची सक्ती केली जाते. त्यामध्ये गर्भवती महिलेने भाजी चिरू नये, कात्रीने काही कापू नये, नाहीतर बाळाचे ओठ फाटतात. अशी मोठी अंधश्रद्धा आज ही आपल्या समाजात आहे. ही अंधश्रद्धा दूर करण्यासाठी चांदणी प्रफुल्ल थोरात या गर्भवती मातेने आज ग्रहण काळात भाजी चिरली, कात्रीने कागद कापले, जेवण केले.

"ग्रहणात गरोदर स्त्रियांनी भाजी चिरली तर बाळाचे ओठ फाटतात" या पिढ्यानपिढ्या चालत आलेल्या भ्रामक कल्पनेला आज चांदणी प्रफुल्ल थोरात या गर्भवती मातेने छेद दिला. आजच्या चंद्रग्रहणाच्या काळात स्वतः या गरोदर मातेने भाजी चिरून, फळे खाऊन या जुनाट अंधश्रद्धेवर प्रहार केला. ग्राहनाच्या दुपारी ३ वाजता ग्रहणाचा वेध सुरू झालेवर, या गरोदर मातेने विविध भाज्या चिरल्या. "माझ्या होणाऱ्या बाळावर कोणत्याही अंधश्रद्धेचा नव्हे, तर वैज्ञानिक दृष्टिकोनाचा संस्कार व्हावा, यासाठी मी हे धाडसी पाऊल उचलले आहे, या माझ्या छोट्या कृतीने गरोदर महिलांना अंधश्रद्धेतून बाहेर पडण्यास बळ मिळेल अशी मला आशा आहे. तसेच माझे माहेरचे आणि सासरचे कुटुंबीय पुरोगामी आणि विज्ञानवादी असल्यामुळे मी हे धाडस करू शकले" असे मत चांदणी प्रफुल्ल थोरात यांनी यावेळी व्यक्त केले.चांदणी या अंनिसचे कार्यकर्ते राहुल थोरात यांच्या वहिनी आहेत.

Advertisement

या उपक्रमाचे महत्त्व सांगताना अंनिस चे कार्यकर्ते राहुल थोरात म्हणाले की, "खगोलशास्त्रीय दृष्टीने ग्रहण ही केवळ सावल्यांचा खेळ असलेली एक खगोलीय घटना आहे. मात्र, आजही समाजातील मोठा वर्ग, विशेषतः गरोदर महिलांना या काळात अनेक जाचक अंधश्रद्धा पाळण्याची सक्ती केली जाते. "भाजी चिरल्याने बाळाला इजा होते, ओठ फाटतात" या अंधश्रद्धेला कोणताही शास्त्रीय आधार नाही, ही अंधश्रद्धा दूर करण्यासाठी महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या पुढाकाराने हा 'सोडा अंधश्रद्धेचे ग्रहण' हा अभिनव उपक्रम राबवण्यात आला.

स्री रोग तज्ञ आणि खगोल अभ्यासक डॉ. संजय निटवे म्हणाले की, "बाळाचे ओठ फाटणे हे जनुकीय कारणांमुळे किंवा गर्भावस्थेतील पोषणाच्या अभावामुळे होते. त्याचा ग्रहणाशी किंवा भाजी चिरण्याशी दुरान्वयेही संबंध नाही."

महाराष्ट्र अंनिसच्या कार्यकर्त्या डॉ. सविता अक्कोळे यांनी सांगितले की, अशा प्रकारच्या ग्रहणा संबंधी भीतीदायक अफवांमुळे गरोदर महिला विनाकारण मानसिक तणावाखाली येतात. हा तणाव बाळासाठी घातक ठरू शकतो. त्यामुळे अशा फोल समजुतींना फाटा देऊन महिलांनी मुक्तपणे वावरावे.

महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या या अभिनव उपक्रमात सहभाग घेतलेल्या आणि ग्रहण काळात भाजी चिरून अंधश्रद्धा नाकारणाऱ्या चांदणी प्रफुल थोरात या गर्भवती मातेचे अंनिसचे कार्यकर्ते डॉ. हमीद दाभोलकर, मिलिंद देशमुख, नंदिनी जाधव, मुक्ता दाभोलकर, अण्णा कडलास्कर यांनी कौतुक आणि अभिनंदन केले आहे.

Advertisement
Tags :

.