कपटी चीनऐवजी भारतात अखेरचा श्वास घेणे पसंत
दलाई लामा यांचे विधान
वृत्तसंस्था / धर्मशाळा
तिबेटी धर्मगुरु दलाई लामा यांनी कपटी चिनी सैन्याच्या नियंत्रणाखालील भागाऐवजी भारतातील खरे प्रेम करणाऱया लोकांमध्ये, एका स्वतंत्र आणि मुक्त लोकशाहीत अखेरचा श्वास घेणे पसंत करणार असल्याचे गुरुवारी म्हटले आहे. हिमाचल प्रदेशच्या धर्मशाळा येथील स्वतःच्या निवासस्थानी संयुक्त राज्य शांती संस्थेकडून आयोजित दोन दिवसीय संवाद कार्यक्रमात युवा नेत्यांना दलाई लामा यांनी संबोधित केले आहे.
आणखी 15-20 वर्षे जिवंत राहणार यात कुठलाच संशय नाही. मृत्यूसाठी मी भारताची भूमी निवडणार आहे. भारत हा आत्मियता दर्शविणाऱया लोकांचा देश आहे. चिनी अधिकाऱयांच्या तावडीत मरण आल्यास माझ्यासाठी ती बाब दुर्दैवी असणार आहे. मी भारताच्या स्वतंत्र लोकशाहीत मरण पत्करणे पसंत करणार आहे. मृत्यूसमयी कुठल्याही विश्वासू मित्रांनी वेढलेले असावे, हे मित्र तुम्हाला खऱया भावना दाखवून देत असतात असे दलाई लामा यांनी म्हटले आहे.
1950 च्या दशकात चीनने तिबेटवर कब्जा केल्यावर दलाई लामा यांनी भारतात आश्रय घेतला होता. दलाई लामा यांच्याप्रकरणी भारत सरकारची भूमिका स्पष्ट आणि सुसंगत राहिली आहे. भारतात दलाई लामा यांना मोठा आदर प्राप्त आहे. दलाई लामा यांना भारताने पूर्ण धार्मिक कृत्यांसाठी पूर्ण मोकळीक दिली आहे.