'चाकरमानी' नव्हे तर 'कोकणवासी'ला पसंती
रत्नागिरी :
कामानिमित्त गावाकडील तरुण, तरुणी, नागरिक मुंबई, पुणे अशा मोठ्या शहरात जातात. मात्र हेच नागरिक कोकणातील मोठा सण समजला जाणाऱ्या गणेशोत्सवासाठी उत्साहात कोकणात येतात. त्यामुळे या नागरिकांसाठी चाकरमानी हा शब्द पिढ्यानपिढ्या वापरला जातो. मात्र आता या चाकरमानी शब्दाला राज्य शासनाने 'कोकणवासी' अशी नवी ओळख देण्याचा प्रयत्न केला आहे. शासनाच्या या निर्णयाबाबत चर्चाना आता उधाण आले आहे. याबाबत तरुण भारत संवादने 'चाकरमानी' की कोकणवासी यावर प्रतिक्रिया घेतल्या आहेत. यामध्ये बहुतांश नागरिकांनी कोकणवासी या शब्दाला पसंती दिली आहे.
गावाकडून मुंबईला गेलेले नागरिक गणेशोत्सव, शिमगा या सणांना कुटुंबासोबत गावात येतात आणि या पूर्ण कुटुंबालाच चाकरमान्यांचे कुटुंब असे संबोधले जाते. मात्र, या शब्दावरून अनेक संघटनांनी निराशा व्यक्त केली आहे. या संदर्भात काही संघटनांनी अर्थमंत्री अजित पवार यांच्याकडे औपचारिक मागणी केली होती. त्यांनी 'चाकरमानी' या शब्दाऐवजी 'कोकणवासी' हा शब्द अधिक सन्मानजनक आणि योग्य असल्याचे मत मांडले. या मागणीला सकारात्मक प्रतिसाद देत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी तातडीने निर्णय घेण्याचे निर्देश दिले आहेत.
लवकरच सरकारकडून अधिकृत परिपत्रक जारी होणार असून आता सरकारी कागदपत्रांपासून ते सार्वजनिक संदर्भामध्ये 'चाकरमानी 'ऐवजी 'कोकणवासी' हा शब्द वापरण्यात येईल, असे सांगण्यात आले. या निर्णयामुळे कोकणातील रहिवाशांमध्ये संमिश्र प्रतिक्रिया उमटत आहेत.
- चाकरमानी शब्दात परकेपणा जाणवतो
चाकरमानी या शब्दामुळे उगाच परकेपणाची जाणिव होते. आम्ही मूळचे कोकणातील रहिवासी असूनही कोकणातले नसल्यासारखे वाटते. मुंबईत कामाच्य ठिकाणी आम्हाला चाकरमानी असे संबोधल्यास काही वाटत नाही मात्र, कोकणात आम्ही येतो तेव्हा तरी आम्हाला निदान कोकणवासीय म्हणावे.
- वृषा भाटकर, मुंबई
- कोकणवासीय हा शब्द जास्त जवळचा वाटतो
नोकरी आणि व्यवसायाच्या निमित्ताने मुंबईत राहत असलो तरी आमची नाळ गावाशीच जोडलेली आहे. तेथील नाती आम्हाला जास्त जवळची वाटतात. त्यामुळे चाकरमानी या शब्दापेक्षा कोकणवासीय हा शब्द जास्त जवळचा वाटतो.
- शिल्पा निवळकर-केळकर, डोंबिवली
- आमचा जन्म कोकणातला तर आम्ही कोकणवासीयच
आम्ही मूळचे कोकणातील असूनही आम्हाला चाकरमानी म्हणणे योग्य नाही. त्यामुळे शासनाच्या निर्णयाप्रमाणे आम्हाला कोकणवासीयच म्हणावे.
संतोष विचारे-रत्नागिरी (अनेक वर्ष कामानिमीत्त मुंबईत असणारे)
- चाकरमानी म्हणजेच कोकणातले रहिवासी
चाकरमानी हा शब्द खूप पारंपरिक आहे. हा शब्द खूप जणांना आवडतो. आम्ही कोकणातले हे वेगळे सांगण्याची काहीच गरज नाही. कोकणवासीय असे वेगळे संबोधन असावे असे वाटत नाही.
- पर्णिका भडसावळे-जोशी
- चाकरमानी शब्दात गोडवा
चाकरमानी हा कोकणी बोलिभाषेतील शब्द आहे. आणि या शब्दात गोडवा आहे. गेली कित्येक वर्षे गावी आल्यावर मानाने आम्हाला चाकरमानी म्हणून हाक मारली जाते. आणि यात कोणताही कमीपणा वाटत नाही.
- मिलिंद कोतवडेकर, डोंबिवली