धामणे भागातील शिवारात पेरणीपूर्व मशागतीच्या कामाला जोर
वार्ताहर/धामणे
यंदा धामणे, जुने बेळगाव, हलगा, बस्तवाड या भागात वळीव पाऊस मागील महिन्याच्या सुरुवातीला चांगला झाल्याने या भागातील शेतकऱ्यांना पेरणीपूर्व मशागतीच्या कामाला चांगली संधी मिळाल्याने गेल्या पंधरा दिवसांत शेतातील मशागतीच्या कामाला जोर लावला होता. त्यामुळे आता मशागतीची कामे अंतिम टप्प्यात आली आहेत. भात पिकाच्या शिवारातील मशागतीची कामे जवळपास संपत आली असली तरी काटे शिवारातील मशागतीच्या कामाला आता या भागातील शेतकरी सुरुवात करत असताना दिसत आहेत. धामणे, बस्तवाड या दोन गावांना भात पिकाच्या शेतीबरोबर काटे शिवार जास्त प्रमाणात आहे. त्यामुळे काटे शिवारात बटाटा, भुईमूग, सोयाबिन ही पावसाळी पिकांची लागवड करतात. त्याचप्रमाणे मागील दोन वर्षांपासून येथील शेतकरी रताळ्यांची लागवड मोठ्या प्रमाणात करत आहेत. यंदा पेरणीपूर्व मशागतीची सर्व कामे ट्रॅक्टरच्या सहाय्याने 90 टक्के शेतकरीवर्ग करत आहेत. त्यामुळे ट्रॅक्टरचा व्यवसाय सध्या तेजित असल्याचे दिसत आहे.