For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

मान्सूनपूर्व पावसाने गोव्याला झोडपले

04:16 PM May 21, 2025 IST | Tarun Bharat Portal
मान्सूनपूर्व पावसाने गोव्याला झोडपले
Advertisement

राज्याच्या सर्वच भागांमध्ये मुसळधार : अनेक ठिकाणी झाडे, फांद्या कोसळल्या,वाहतूक रखडली, जनजीवन विस्कळीत

Advertisement

पणजी : मान्सूनपूर्व पावसाने संपूर्ण गोव्याला मंगळवारी झोडपून काढले. पेडणेमध्ये साडेसहा इंच तर म्हापसामध्ये सव्वा सहा इंच पावसाची विक्रमी नोंद झाली. पणजीमध्ये सव्वातीन इंच पाऊस पडला. हवामान खात्याने पुन्हा एकदा मुसळधार पावसाचा इशारा देऊन गोव्यात नारंगी अलर्ट जारी केला आहे. मुसळधार पावसामुळे पणजीसह राज्यातील विविध शहरांमध्ये पाणी साचून नागरिकांची धांदल उडाली. वाहनचालक तसेच पादचाऱ्यांनादेखील हा पाऊस फार अडचणीचा ठरला. पणजी वेधशाळेने गोव्यात मंगळवारपासून तीन दिवस मुसळधार पाऊस पडेल, असा इशारा दोन दिवसांपूर्वीच दिला होता.

मात्र हवामान खात्याचा अंदाज खरा ठरतोच असे नाही असे समजून अनेकांनी छत्री व रेनकोट आणले नसल्याने आणि सकाळपासून जोरदार तथा मुसळधार पाऊस सुरू झाल्याने कार्यालयात जाणाऱ्या बहुतांश कर्मचाऱ्यांची त्रेधा तिरपीट उडाली. मुसळधार पावसाने अनेकजण कार्यालयात पोहोचेपर्यंत भिजून गेले. सोमवारपासूनच गोव्यात विविध ठिकाणी मुसळधार पावसाला प्रारंभ झाला आहे. सोमवारी पडलेला एकंदरीत पाऊस पाहता दक्षिण गोवात उत्तर गोव्यापेक्षा सर्वाधिक पाऊस झाला. गेल्या 24 तासात सांगेमध्ये पावणेतीन इंच, मडगावात पावणेदोन इंच, केपेमध्ये दीड इंच, काणकोण, पेडणे या ठिकाणी प्रत्येकी अर्धा इंच पावसाची नोंद झाली. गोव्यात सर्व ठिकाणी सोमवारी सायंकाळी व मध्यरात्रीच्या सुमारास पाऊस पडला.

Advertisement

ऑरेंज अलर्टचा पहिला दिवस

पणजी वेधशाळेने रविवारी जारी केलेल्या माहितीनुसार मंगळवारपासून तीन दिवस गोव्यात ऑरेंज अलर्ट राहील आणि या दरम्यान संपूर्ण गोव्यात मुसळधार होईल, असा सावधानतेचा इशारा दिला होता. गोव्यातील अनेक भागात पहाटेपासूनच पावसाला प्रारंभ झाला तर काही भागात विशेषत: पणजीमध्ये सकाळी 11 वाजल्यापासून पावसाला प्रारंभ झाला. काळ्याकुट्ट ढगांनी संपूर्ण आकाश व्यापले गेले. त्यामुळे भर दुपारी तीन वाजता सर्वत्र अंधार पसरलेला. सायंकाळी पावणेसात वाजता जी परिस्थिती असते तशी परिस्थिती दुपारी तीन वाजता दिसत होती.

पणजीत सर्वत्र पाणीच पाणी

पणजी सकाळी 11 पासून दुपारी एकपर्यंत जोरदार पाऊस पडला आणि त्यानंतर दुपारी तीन वाजल्यापासून सायंकाळी साडेपाचपर्यंत सर्वत्र मुसळधार पाऊस झाला. पणजीत सकाळी पडलेल्या पावसामुळे बसस्थानक व आसपासच्या परिसरात सर्वत्र पाणी साचले होते. त्यामुळे त्यातून वाहन चालविताना अनेक दुचाकीचालकांना फार त्रास सहन करावा लागला. दिवसभराच्या मुसळधार पावसामुळे संपूर्ण गोव्यातील जनजीवन विस्कळीत झाले. पणजीसह गोव्यातील विविध भागात दिवसभर पडलेल्या मुसळधार पावसाने अनेक भागात पावसाचे पाणी शिरले. डिचोलीसारख्या शहरांमध्ये रस्त्यावरचे पाणी घरामध्ये शिरले.

बसस्थानकावर साचले पाणी

पणजी बसस्थानक, 18 जून रस्ता आदी ठिकाणी पाणी साचले होते. त्यामुळे काही काळ वाहनचालकांना कसरत करावी लागली. जोरदार पावसामुळे सकाळी लोकांची धांदल उडाली. मार्केटमध्ये खरेदीसाठी आलेले नागरिक दुकानांच्या आडोशाला उभे राहून पाऊस थांबण्याची वाट पाहत होते. परंतु दिवसभर पाऊस सुरूच राहिल्याने अखेर काही लोकांनी पावसात भीतच घराची वाट धरली.

झांडांची पडझड, वीज खंडित 

मुसळधार पावसाबरोबरच जोरदार वारे सुरू झाल्याने कित्येक ठिकाणी झाडे कोलमडून पडली. सुदैवाने जीवित हानी झाली नाही. ग्रामीण भागातील रस्त्यावर, विजेच्या तारांवर झाडे पडून नुकसानीच्या घटनांची नोंद झाली. पडझड झाल्याने ग्रामीण भागात काही ठिकाणी वीज पुरवठा खंडीत झाला. राज्यात काही ठिकाणी मान्सूनपूर्व कामे झाली नसल्याने गटारी तुंबून रस्त्यावर पाणी साचण्याच्या घटना घडल्या.

गोव्यावर कमी दाबाचा पट्टा

गोव्यात आज आणि उद्यादेखील ऑरेंज अलर्ट जारी केलेले असून या दोन्ही दिवसात मुसळधार पाऊस पडणार असा इशारा हवामान खात्याने दिला आहे. गोव्यावर कमी दाबाचा पट्टा असून तो हळूहळू गुजरातकडे सरकण्याची चिन्हे आहेत. त्याचबरोबर अरबी समुद्रातील कमी दाबाच्या पट्ट्याचे चक्रीवादळात रूपांतर होऊ शकते, याबाबतची सविस्तर माहिती आज बुधवारी कळणार आहे.

मच्छीमारांनी खोल समुद्रात जाऊ नये

दरम्यान अरबी समुद्रातील कमी दाबाच्या पट्ट्यामुळे जोरदार वादळी वारे असल्यामुळेच मच्छीमारांनी मासेमारीसाठी खोल समुद्रात जाऊ नये, असा इशारा हवामान खात्याने दिला आहे. कारण समुद्र बराच खवळलेला आहे आणि बऱ्याच मोठा लाटा असल्यामुळे वातावरण धोकादायक बनले आहे.

मान्सूनपूर्व पावसाचा असाही विक्रम

पणजी वेधशाळेने सायंकाळी दिलेल्या माहितीनुसार ऑरेंज अलर्टच्या पहिल्या दिवशी सकाळी साडेआठ ते सायंकाळी साडेपाच या दरम्यान पेडणेमध्ये 6.50  इंच, म्हापसा 6.25 इंच, पणजी 3.25 इंच, मुरगाव 3 इंच, वाळपई, सांगे व  केपेमध्ये प्रत्येकी 1.50 इंच, व फोंडा 1.25 इंच पावसाची विक्रमी नोंद झाली आहे.

दाबोळीतील हवाई वाहतुकीला फटका

मंगळवारी दुपारपासून पडलेल्या जोरदार पावसाचा फटका दाबोळी विमानतळावरील हवाई वाहतुकीलाही बसला. दाबोळी विमानतळावर उतरण्याच्या प्रतिक्षेत असलेली दोन विमाने खराब हवामानामुळे इतर विमानतळांकडे वळवण्यात आली. पुण्याहून गोव्याकडे आलेले विमान हैदराबादकडे वळवण्यात आले. मुंबईहून गोव्याकडे आलेले विमान प्रतिक्षेनंतर बेळगावकडे वळवण्यात आले. मात्र, हवामानात सुधारणा होताच संध्याकाळी ही विमाने पुन्हा दाबोळी विमानतळाकडे वळली. मात्र, मुंबई गोवा तसेच पुणे गोवा हवाई मार्गावरील येणाऱ्या व जाणाऱ्या प्रवाशांची बरीच गैरसोय झाली.

Advertisement
Tags :

.