मान्सूनपूर्व पावसाने उडविली दाणादाण
पडझड, नुकसानीच्या अनेक घटना : 23.99 लाखाचे नुकसान,95.90 लाखांची मालमत्ता वाचविली
पणजी : गेल्या चार दिवसांत राज्यात सुरू झालेल्या मान्सूनपूर्व पावसाने सर्व गोमंतकीय जनतेची दाणादाण उडवली. पडझड, नुकसानीच्या अनेक घटना घडल्या आहेत. 20 ते 23 मे या कालावधीत राज्यात झाडांची पडझड आणि आगीच्या घटनेने 23 लाख 99 हजार ऊपयांचे नुकसान झाले आहे. अग्निशामक दलाने केलेल्या कारवाईत 95 लाख 90 हजार ऊपयांची मालमत्ता वाचविण्यात आली आहे.
यंदा मान्सूनपूर्व पाऊस थोडा लवकर लागल्याने लोकांची तारांबळ उडाली. मान्सूनपूर्व अनेक कामे खोळंबून राहिली आणि नुकसानीला सामोरे जावे लागले. चार दिवसांत अग्निशामक दलाला आलेल्या 372 फोन कॉलपैकी 329 कॉल हे झाडे कोसळल्याची होती. तर 43 कॉल इतर होते. दोन आगीच्या घटनांमध्ये 4 लाख 20 हजार ऊपयांचे नुकसान झाले, तर 1 लाख 21 हजार ऊपयांची मालमत्ता वाचविण्यात अग्निशामक दलाला यश आले आहे.
झाडे कोसळल्याचे सर्वाधिक कॉल
गेल्या चार दिवसांत अग्निशामक दलाला एकूण 372 कॉल आले होते. त्यात 329 कॉल झाडे कोसळल्याचे होते. अग्निशामक दलाला आलेल्या फोन कॉलमध्ये 20 मे रोजी 92 कॉल आले तर 66 कॉल झाडे कोसळल्याचे होते. 21 रोजी एकूण कॉल 91 त्यात 83 कॉल झाडे कोसळल्याची होते. 22 रोजी 107 फोन कॉल होते. त्यात 103 कॉल झाडे कोसळल्याचे होते. 23 रोजी 82 कॉल होते त्यात 77 कॉल झाडे कोसळल्याचे होते.