पूर्वमोसमी पावसाचे तीन राज्यात 57 बळी
आसाममध्ये 7 लाख लोक बाधित ः बिहार-कर्नाटकमध्येही मोठी जीवितहानी
पटना, गुवाहाटी / वृत्तसंस्था
मान्सूनपूर्व पावसाने काही राज्यांमध्ये हाहाकार निर्माण केला आहे. गडगडाट आणि पावसाने बऱयाच ठिकाणी विध्वंस झाला असून बिहार, आसाम आणि कर्नाटक या तीन राज्यात नैसर्गिक आपत्तींमुळे 57 जणांना जीव गमवावा लागला आहे. आसाममध्ये आतापर्यंत 15 जणांना आपला जीव गमवावा लागला आहे. बिहारमध्ये वीज पडून सर्वाधिक 33 मृत्यू झाले आहेत. त्याचवेळी कर्नाटकातही 9 जणांचा मृत्यू झाल्याची बातमी आहे.
पूर्व आणि दक्षिण भारतात पूर्वमोसमी पावसाची दमदार सलामी सुरू असताना आता उत्तर भारतातही वातावरण दमट होण्यास सुरुवात झाली आहे. खराब हवामानामुळे दिल्लीहून आलेल्या 10 विमानांना अमृतसर विमानतळावर उतरावे लागले. 21 ते 24 मे दरम्यान अनेक राज्यांमध्ये पावसाची शक्मयता हवामान खात्याने वर्तवली आहे. त्याचबरोबर 23 मे रोजी मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे.
आसाममध्ये परिस्थिती सर्वात बिकट बनली आहे. येथे ब्रह्मपुत्रेला महापूर आला असून उपनद्याही तुडुंब भरून वाहत आहेत. पावसाच्या या पहिल्याच दणक्यात शेकडो गावांना मोठा फटका बसला आहे. काही लोकांना जलसमाधी मिळाली असून 7 लाखांहून अधिक लोकांना पुराचा फटका बसला आहे. तसेच पिकेही नष्ट झाली आहेत.
आसाममध्ये 7.12 लाख लोक प्रभावित
आसाम राज्य आपत्ती व्यवस्थापनानुसार राज्यातील 29 जिह्यांमध्ये सुमारे 7.12 लाख लोक पुरामुळे प्रभावित झाले आहेत. जमुनामुख जिह्यातील दोन गावांतील 500 हून अधिक कुटुंबांनी रेल्वे ट्रकवर तात्पुरता निवारा केला आहे. एकटय़ा नागाव जिह्यात 3.36 लाखांहून अधिक लोक बाधित झाले आहेत, तर कचर जिह्यात 1.66 लाख, होजईमध्ये 1.11 लाख आणि दरंग जिह्यात 52,709 लोक बाधित झाले आहेत.
बिहारमध्ये सर्वाधिक 33 मृत्यू
बिहारमधील 16 जिल्हय़ांमध्ये शुक्रवारपर्यंत वादळ आणि वीज पडून 33 जणांचा मृत्यू झाला. मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी या दुर्घटनेत मृत्युमुखी पडलेल्यांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी 4 लाख रुपयांची मदत जाहीर केली आहे. येथे शनिवारी आणि रविवारी काही भागांत ढगांच्या गडगडाटासह हलका पाऊस पडू शकतो, असे राज्य हवामान विभागाचे म्हणणे आहे.
भागलपूरमध्ये 7 जणांचा बळी
वादळ आणि वीज कोसळण्याच्या दुर्घटनांमुळे भागलपूरमध्ये 7, मुझफ्फरपूरमध्ये 6, सारणमध्ये 3, लखीसरायमध्ये 3, मुंगेरमध्ये 2, समस्तीपूरमध्ये 2, जेहानाबादमध्ये एक, खगरियामध्ये एक, नालंदामध्ये एक, पूर्णियामध्ये एक, बांकामध्ये एक, बेगुसरायमध्ये एक, अररियामध्ये एक, जमुईमध्ये एक, कटिहारमध्ये एक आणि दरभंगामध्ये एकाचा मृत्यू झाला.
काश्मीर ः भुयारी मार्ग दुर्घटनेत गाडलेल्या मजुरांचा शोध सुरूच जम्मू-काश्मीरमधील रामबन जिह्यातील भुयारी मार्ग दुर्घटनेला शनिवारी तीन दिवस पूर्ण झाले आहेत. अजूनही 9 मजूर बोगद्याच्या ढिगाऱयात अडकले आहेत. त्यांना वाचवण्यासाठी शनिवारी सकाळी पुन्हा बचावकार्य सुरू करण्यात आले. लवकरात लवकर माती-दगडांचा ढिगारा हटवण्यासाठी यंत्रणा आणि तांत्रिक कर्मचारी वाढवण्यात आले आहेत. मात्र, अजूनही गाडलेल्या सर्व मजुरांचा मागमूस लागलेला नाही.