For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

बहुचर्चित पूजा शर्माला अटकपूर्व जामीन

11:58 AM Jul 21, 2024 IST | Tarun Bharat Portal
बहुचर्चित पूजा शर्माला अटकपूर्व जामीन
Advertisement

आसगाव येथील आगरवाडेकर यांचे घरतोड प्रकरण : घटनेनंतर महिन्याभराने सोमवारी येणार गोव्यात

Advertisement

पणजी : आसगाव येथील आगरवाडेकर कुटुंबीयांचे घर पाडण्याच्या प्रकरणात मुख्य  संशयित आरोपी असलेल्या पूजा शर्मा हिचा अटकपूर्व जामीन अर्ज मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपीठाने सशर्त मंजूर केला आहे. पूजा शर्माने तपास अधिकाऱ्यांसमोर सोमवार दि. 22 जुलै रोजी हजर राहून चौकशीला मदत करावी तसेच पूजा हिला अटक केल्यास 50 हजार ऊपयांच्या वैयक्तिक हमीवर सुटका करण्याची सूचनाही खंडापीठाचे न्या. भारत देशपांडे यांनी केली आहे.

आसगाव येथील ‘आल्ता’ वाड्यावरील सर्व्हे क्रमांक 135/1ए मधील 600 चौमी जमिनीत आगरवाडेकर कुटुंबीय राहत असलेल्या घराचा काही भाग 22 जून रोजी दुपारी पाडण्यात आला होता. त्यासाठी जेसीबी आणि बाऊन्सरचा बळजबरीने वापर करण्यात आल्याने हे प्रकरण राज्यभर गाजले होते. सदर घर पाडण्यामागे पोलिसांनी मुख्य संशयित आरोपी असलेल्या पूजा शर्माला चौकशीसाठी आणण्यासाठी केलेल्या अथक प्रयत्नांना आता महिनाभरानंतर यश येणार आहे. गोवा खंडपीठाने पूजा हिला उद्या 22 जुलै रोजी हजर राहून पोलिसांच्या चौकशीला सामोरे जाण्याचा आदेश दिला आहे.

Advertisement

न्या. भारत देशपांडे यांनी आपल्या निकालात ‘जामीन मिळणे हा नियम, आणि जेल जाणे हा अपवाद आहे’ असे खास नमूद केले आहे. सरकारी वकिलांनी संशयित अर्जदाराला चौकशीसाठी अटक करून पोलीस कोठडीची गरज नसल्याचे म्हटल्याकडे न्यायालयाने आपला भर दिला. याशिवाय, क्राईम ब्रांचने पाठवलेल्या नोटिशीला उत्तर देताना अटक होण्याची भीती याचिकादाराने व्यक्त केल्याने तिला अटक होण्यापासून संरक्षण मिळणे गरजेचे असल्याचे न्यायालयाने निकालात म्हटले आहे. पोलिसांनी फौजदारी कायद्याच्या कलम- 41 (अ) खाली शर्मा हिला हजर राहण्यासाठी समन्स पाठवताना सखोल तपास करण्यासाठी अर्जदाराला पोलीस कोठडीत ठेवण्याची गरज असल्याचे पोलिसांनी न्यायालयात मान्य केले असून  फौजदारी कायद्याच्या नियमांचा पोलिसांनी पालन केले नसल्याचा शेरा न्यायालयाने पोलीस कामकाजावर मारला आहे.

पूजा शर्मा हाजीर हो!

पोलीस तपासासाठी पूजा शर्माला अटक करण्याची आवश्यकता नसल्याचे नमूद करून शर्माला अटक केल्यास 50 हजार ऊपयांच्या वैयक्तिक हमीवर आणि तत्सम रकमेचा हमीदार घेऊन अन्य अटींचे पालन केल्यावर सुटका करण्याचा आदेश  गोवा खंडपीठाने दिला आहे. यामध्ये अर्जदाराने पोलीस स्थानकात 22 जुलै रोजी सकाळी 10 वाजता हजर राहून तपासाला साहाय्य करणे, वेळोवेळी सूचनेनुसार पोलीस अधिकाऱ्यांसमोर हजर राहणे, साक्षीदारांवर अथवा तपासकामात हस्तक्षेप न करणे, परवानगीशिवाय देश सोडून जाऊ नये आदी अटी घालण्यात आल्या आहेत.

Advertisement
Tags :

.