For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

भवानी रेवण्णा यांना अटकपूर्व जामीन

06:22 AM Jun 19, 2024 IST | Tarun Bharat Portal
भवानी रेवण्णा यांना अटकपूर्व जामीन
Advertisement

उच्च न्यायालयाकडून मोठा दिलासा

Advertisement

प्रतिनिधी/ बेंगळूर

लैंगिक शोषणाला बळी पडलेल्या पीडित महिलेच्या अपहरण प्रकरणात आरोप असलेल्या निजद आमदार एच. डी. रेवण्णा यांची पत्नी भवानी रेवण्णा यांना उच्च न्यायालयाने मंगळवरी अटकपूर्व जामीन मंजूर केला आहे. त्यामुळे अटकेची भीती असलेल्या भवानी रेवण्णा यांना मोठा दिलासा मिळाला आहे.

Advertisement

पीडित महिलेच्या अपहरणप्रकरणी मागील आठवड्यात सुनावणी पूर्ण करून उच्च न्यायालयाने निकाल राखून ठेवला होता. मंगळवारी न्यायमूर्ती कृष्ण एस. दीक्षित यांच्या खंडपीठाने भवानी रेवण्णा यांच्या अटकपूर्व जामीन याचिकेवर अंतिम आदेश दिला. पोलिसांनी समोर ठेवलेल्या 85 प्रश्नांना भवानी यांनी उत्तरे दिली आहेत. त्यामुळे त्या तपासाला सहकार्य करत नसल्याचा एसआयटीचा युक्तिवाद खंडपीठाने फेटाळून लावला. तसेच पोलिसांना अपेक्षित उत्तरेच दिली पाहिजे असे नाही, असे न्यायालयाने म्हटले आहे. तसेच भवानी यांना म्हैसूर आणि हासन जिल्ह्यात प्रवेश करता येणार नाही. चौकशीसाठी एसआयटीच्या पथकाला सहकार्य करावे, अशी अट खंडपीठाने घातली आहे.

दोन आठवड्यांपूर्वी उच्च न्यायालयाने भवानी रेवण्णा यांना एक आठवड्याचा अंतरिम अटकपूर्व जामीन मंजूर केला होता. तत्पूर्वी एसआयटीने भवानी रेवण्णा यांना नोटीस बजावून चौकशीला हजर राहण्याची सूचना केली होती. मात्र, त्यांनी आपण होळेनरसीपूर येथील निवासस्थानी चौकशीला उपलब्ध राहू, असे सांगितले होते. त्यानुसार एसआयटीचे पथक त्यांच्या निवासस्थानी गेले होते. मात्र, त्या तेथे नव्हत्या. त्यामुळे भवानी यांच्या अटकेसाठी एसआयटीने न्यायालयाकडून अटक वॉरंट मिळविले होते. याविरोधात त्यांनी उच्च न्यायालयात अटकपूर्व जामिनासाठी याचिका दाखल केली होती.

Advertisement
Tags :

.