For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.
Advertisement
Maharashtra Government – Diwali

आधी फॅन्सी नंबर बुक, मग गाडी खरेदी! प्रयाग चिखलीकरांचा अनोखा नाद; आरटीओला मोजले 19.19 कोटी रुपये

01:20 PM Nov 02, 2026 IST | Tarun Bharat Portal
आधी फॅन्सी नंबर बुक  मग गाडी खरेदी  प्रयाग चिखलीकरांचा अनोखा नाद  आरटीओला मोजले 19 19 कोटी रुपये
Advertisement
| नीता पोतदार, कोल्हापूर : प्रत्येक गोष्टीत ‘नाद खुळा’ असणाऱ्या कोल्हापूरकरांची वाहनांच्या फॅन्सी नंबरची आवडही तितकीच भन्नाट आहे. आवडीचा वाहन क्रमांक मिळवण्यासाठी कोल्हापूरकरांनी यंदा आरटीओच्या तिजोरीत तब्बल 19 कोटी 19 लाख 57 हजार रुपये जमा केले आहेत. विशेष म्हणजे, या नंबरप्रेमात करवीर तालुक्यातील प्रयाग चिखली गावाने संपूर्ण जिल्ह्यात आघाडी घेतली आहे.

कोल्हापूर आरटीओ कार्यालयाच्या आकडेवारीनुसार, 2025-2026 या आर्थिक वर्षात जिल्ह्यात तब्बल 77 हजार 495 नवीन वाहनांची नोंदणी झाली. यापैकी 17 हजार 257 वाहनधारकांनी आपल्या पसंतीचा नंबर मिळवण्यासाठी अर्ज केला. या फॅन्सी नंबरमधून आरटीओला विक्रमी 19 कोटी 19 लाख 57 हजार रुपयांचे उत्पन्न मिळाले आहे.

Advertisement

प्रयाग चिखलीचा फॅन्सी नंबरचा नाद

कोल्हापूर शहराच्या जवळ वसलेले प्रयाग चिखली हे गाव समृद्ध शेती आणि दुग्धव्यवसायासाठी प्रसिद्ध आहे. मात्र, आता हे गाव वाहनांच्या आवडीच्या नंबरसाठीही ओळखले जात आहे. गावचे सरपंच रोहित पाटील यांच्या माहितीनुसार, प्रयाग चिखलीमध्ये दरवर्षी 100 हून अधिक नवीन वाहनांसाठी पसंतीचे नंबर बुक केले जातात.

दसरा आणि दिवाळीच्या काळात गावात नवीन वाहन खरेदीची मोठी लगबग असते. त्याचबरोबर आवडीचा नंबर आधीच बुक करण्यासाठीही नागरिकांमध्ये चढाओढ पाहायला मिळते. तरुणांपासून ज्येष्ठांपर्यंत सर्वांनाच फॅन्सी नंबरची मोठी क्रेझ आहे.

Advertisement

आधी नंबर, मग गाडी!

प्रयाग चिखलीकरांची वाहन खरेदीची पद्धतही विशेष आहे. सर्वसाधारणपणे आधी गाडीचे मॉडेल निवडले जाते आणि त्यानंतर नंबर घेतला जातो. मात्र, चिखलीकर आधी आरटीओ कार्यालयात जाऊन आपल्या पसंतीचा नंबर बुक करतात. नंबर निश्चित झाल्यानंतरच कोणती गाडी खरेदी करायची, हे ठरवले जाते. आवडत्या नंबरसाठी सहा-सहा महिने वाट पाहण्याचीही त्यांची तयारी असते.

फॅन्सी नंबरसाठी सात हजार रुपयांपासून ते तब्बल 60 हजार रुपयांपर्यंत खर्च केला जातो. गाडीवरील नंबर आणि मोबाईल नंबर एकच असावा, यासाठीही काही ग्रामस्थ अधिक पैसे मोजतात.

“आमच्या चिखलीमध्ये खूप पूर्वीपासून फॅन्सी नंबरची क्रेझ आहे. इथल्या नागरिकांमध्ये तो एक छंदच आहे. गाडीवर जो नंबर आहे, तोच नंबर मोबाईलला घेण्यासाठीही गावकरी अधिक पैसे मोजतात,” असे ग्रामस्थ विठ्ठल साळोखे यांनी सांगितले.

कोल्हापूरकरांच्या या नंबरप्रेमामुळे आरटीओच्या उत्पन्नात मोठी भर पडत असून, प्रयाग चिखलीकरांचा फॅन्सी नंबरचा नाद जिल्ह्यात चर्चेचा विषय ठरत आहे.

Advertisement
Tags :

.