सिंधुदुर्ग शेतकरी फळ बागायतदार संघ विधानसभा निवडणूकीच्या रिंगणात
प्रवीण परब यांनी दाखल केला उमेदवारी अर्ज
दीपक गावकर
सिंधुदूर्ग शेतकरी व फळ बागायतदार संघ संघाच्यावतीने सावंतवाडी विधानसभा मतदार संघातून दोडामार्ग तालुक्यातील कुंब्रल गावचे माजी सरपंच तथा दोडामार्ग तालुका सरपंच संघटनेचे माजी अध्यक्ष प्रविण परब यांचा उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आला. सरकार शेतकऱ्यांची कुठलीही मागणी मान्य करत नाही. शेतमालाला व फळपिकांना कोणताही हमीभाव देत नसल्यामुळे शेतकऱ्यांचा प्रतिनिधी म्हणून प्रवीण परब यांनाविधानसभेत पाठवण्याचा निर्धार यावेळी सावंतवाडी वेंगुर्ले दोडामार्ग या तिन्ही तालुक्यातील शेतकरी आणि बागायतदार यांच्यावतीने करण्यात आला.सरकारची शेतकऱ्यांच्या उत्पादीत मालाला योग्य दर तसेच त्यांच्या इतर समस्या सोडविण्याबाबत सरकारची असंवेदनशीलता असल्यामुळेच शेतकऱ्यांना व बागायतदारांना न्याय मिळवून देण्यासाठीच उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा सावंतवाडी वेंगुर्ले दोडामार्ग या तिन्ही तालुक्यातील शेतकरी आणि बागायतदार यांच्या विविध संघटनेच्यावतीने हा निर्णय घेण्यात आला. प्रवीण परब हे स्वतः शेतकरी कुटुंबातील असल्याने शेतकऱ्यांच्या प्रश्नांची त्यांना जाणीव आहे. त्यामुळे संघटनेचे उमेदवार प्रवीण परब यांना भरघोस मतांनी जिंकून देण्यासाठी गावोगावी प्रचार करण्याचे नियोजन करण्यात आले असून या निवडणुकीत शेतकरी आपली एकजूट दाखवून देतील असा विश्वास संघटनेचे जयप्रकाश चमणकर, विलास सावंत, सुरेश गावडे यांनी व्यक्त केला.
यावेळी शेतकऱ्यांचा आवाज विधानसभेत पोहोचविण्यासाठीच प्रवीण परब यांची उमेदवारी असून शेतकरी विरुद्ध धनशक्ती अशी ही लढाई आहे. राजकारण्यांचे शेतकरी व बागायतदारावर बेगडी प्रेम असून त्यांच्या भूलथापांना बळी न पडण्याचे आवाहन करण्यात आले. जगात यंत्राद्वारे अन्न सोडून सर्व तयार केले जाते मात्र अन्न हे शेतकरीच तयार करतात. मात्र या अन्नदात्या शेतकरी व बागायतदारांच्या प्रश्नाकडे शासनाने नियमित दुर्लक्ष केले. भविष्यात या संघटनेच्या वतीने जिल्हा परिषद पंचायत समिती व ग्रामपंचायत ही निवडणूक लढवण्याचे यावेळी जाहीर करण्यात आले. त्यामुळे सर्व शेतकरी व बागायतदारांनी आपले मित्रपरिवार व नातेवाईक यांना संघटित करून या लढाईचे विजयात रूपांतर करण्याचे आवाहन करण्यात आले.यावेळी सिंधुदुर्ग फळ बागायतदार संघाचे अध्यक्ष विलास सावंत, वेंगुर्ले माजी सभापती जयप्रकाश चमणकर, दोडामार्ग शेतकरी व फळ बागायतदार संघाचे अध्यक्ष संजय देसाई, वेळागर शिरोडा येथील शेतकरी संघर्ष समितीचे अध्यक्ष राजू आंदूर्लेकर, वीज ग्राहक संघटनेचे अध्यक्ष संजय लाड, प्रवीण नाडकर्णी, अँड राजाराम गावडे, प्रगतशील बागायतदार शिवराम आरोलकर, सुरेश गावडे, प्रगतशील शेतकरी नितीन म्हावळणकर, जॅकी डिसोजा, सुहास सावंत, वेंगुर्ले आंबा काजू बागायतदार संघटना व शास्त्रज्ञ विलास ठाकूर, गोपाळ करमळकर, विष्णू सावंत, आकाश नरसुले सुभाष सावंत, संदीप परब आदी सावंतवाडी वेंगुर्ले दोडामार्ग या तिन्ही तालुक्यातील शेतकरी आणि बागायतदार यांच्यासह महिला उपस्थित होत्या.