मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटलसंदर्भात प्रवीण भोसलेंचे पालकमंत्र्यांना निवेदन
सावंतवाडी । प्रतिनिधी
सावंतवाडी विधानसभा मतदारसंघातील अत्यंत जिव्हाळ्याचा प्रश्न असलेला मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल उभारणी संदर्भात माजी राज्यमंत्री प्रवीण भोसले यांनी पुढाकार घेतला असून त्यांनी मुंबई येथील शासकीय निवास्थान सुवर्णगढ येथे राज्याचे मत्स्य व बंदर विकास मंत्री तथा सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री नितेश राणे यांची भेट घेतली. हॉस्पिटल लवकरात लवकर सुरु करण्याच्या दृष्टीने जमिनीचा प्रश्न निकाली काढा आणि आरोग्याच्या प्रश्नाबाबत गांभीर्याने लक्ष द्या असे त्यांनी सूचित करून निवेदन दिले. यावेळी पालकमंत्री नितेश राणे यांनी आपण निश्चितपणे या संदर्भात लक्ष घालून मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटलच्या जागेचा प्रश्न सुटण्याच्या दृष्टीने प्रयत्न केले जातील आणि हे हॉस्पिटल उभारणीबाबत लवकरच पावले उचलली जातील असे आश्वासन दिले. सावंतवाडी येथील मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटलचा प्रश्न गेल्या सात वर्षांपासून अधिक काळ रेंगाळला आहे. उपचारासाठी जनतेला गोव्यावर अवलंबून लावे लागत आहे याप्रश्नी माजी राज्यमंत्री प्रवीण भोसले यांनी पालकमंत्र्यांचे लक्ष वेधले.