कोकणातील रस्ते खड्डेमुक्त करून गणेशभक्तांचा प्रवास सुरक्षित करा
प्रवीण भोसलेंची मुख्यमंत्र्यांकडे पत्राद्वारे मागणी
सावंतवाडी । प्रतिनिधी
गणेश चतुर्थीचा उत्सव अवघ्या काही आठवड्यांवर येऊन ठेपला असताना कोकणात प्रवास करणाऱ्या हजारो गणेशभक्तांच्या सुरक्षिततेसाठी माजी राज्यमंत्री प्रवीण प्रतापराव भोसले यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे मागणी केली आहे. एक पत्र लिहून त्यांनी सध्याच्या रस्त्यांच्या दयनीय स्थितीवर लक्ष वेधले असून, प्रवास सुखकर होण्यासाठी तातडीने उपाययोजना करण्याची विनंती केली आहे.भोसले यांनी आपल्या पत्रात नमूद केले आहे की, पळस्पे फाट्यापासून ते चिपळूण, लांजा, नागोठणे आणि लोणेरे मार्गांपर्यंत रस्त्यांची स्थिती अत्यंत खराब असून ठिकठिकाणी खड्डे, वाहतूक कोंडी आणि बांधकामामुळे त्रासदायक परिस्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे पळस्पे जंक्शनजवळील रस्त्यावरील खड्ड्यांचे त्वरीत डागडुजी,चिरनेर रोड आणि डोलवी-नागोठणे मार्गाची दुरवस्था,कोलाड ते लोणेरे मार्ग एकेरी असल्याने होणारा विलंब,पाली-माणगाव पर्यायी मार्गावर स्पष्ट मार्गदर्शक फलकांची गरज,महिलांसाठी प्रत्येक १०० किमी अंतरावर स्वच्छतागृहांची आवश्यकता,मुंबई-बंगळूरु मार्गावरील उड्डाणपुलांच्या बांधकामाचा प्रवासावर होणारा परिणाम,बोरघाट आणि अमृतांजन पुलाजवळील वाहतूक कोंडीचा प्रश्न सोडविण्यात यावा अशी मागणी भोसले यांनी केलीय . भोसले यांनी मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांना आवाहन केले आहे की, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव व पोलिस महासंचालक यांना योग्य त्या सूचना देऊन तातडीने उपाययोजना कराव्यात, जेणेकरून कोकणात प्रवास करणाऱ्या लाखो भाविकांचा उत्सव आनंददायी आणि सुरक्षित होईल असे त्यांनी पत्रात म्हटले आहे .