प्रतिती, मयंकची जेतेपदाच्या दिशेने वाटचाल
वृत्तसंस्था, मुंबई : आशियाई कनिष्ठ क्लासिकल बुद्धिबळ स्पर्धेत अव्वल मानांकित प्रतिती बोरदोलोई आणि मयंक चक्रवर्ती यांनी मंगळवारी झालेल्या आठव्या फेरीत विजय मिळवून विजेतेपदाच्या दिशेने आणखी एक पाऊल टाकले आहे. प्रतितीने पृषिता गुप्तावर महत्त्वपूर्ण विजय मिळवत आपली एकूण गुणसंख्या 7 अशी केली आहे आणि आघाडी एका पूर्ण गुणाने वाढवली आहे.
तिची सर्वांत जवळची प्रतिस्पर्धी तुर्कमेनिस्तानची शोहरादोवा लेला हिला दक्षिता कुमावतने बरोबरीत रोखले, ज्यामुळे तिची गुणसंख्या 6 झाली. कझाकस्तानची मारिया खोल्याव्हको आणि श्राव्यश्री भीमरासेट्टी यांनीही महत्त्वाचे विजय नोंदवत 6 गुणांपर्यंत मजल मारली आहे. खुल्या गटात मयंक चक्रवर्तीने दक्ष गोयलचा पराभव करून 7 गुणांसह विजेतेपदावरील आपली पकड मजबूत केली. त्याचा सर्वांत जवळचा प्रतिस्पर्धी रशियाचा आर्टेम पिंगिन याने विग्नेश अद्वैत वेमुलावर महत्त्वपूर्ण विजय मिळवून 6.5 गुणांचा स्तर गाठला.
दुसरीकडे, शर्नार्थी वीरेशला अपूर्व कांबळेने बरोबरीत रोखले आणि त्याची गुणसंख्या 6 झाली, तर माधवेंद्र प्रताप शर्माने तुर्कमेनिस्तानच्या अहमद गुबतायेव्हचा पराभव करून 6 गुण मिळवले. आता केवळ एक फेरी बाकी असताना मयंककडे पिंगिनपेक्षा अर्ध्या गुणाची आघाडी आहे, ज्यामुळे खुल्या स्पर्धेचा शेवट रोमांचक होणार आहे. दरम्यान, दोन्ही गटांतील विजेतेपदाची शर्यत निर्णायक अंतिम फेरीकडे सरकत असताना प्रतितीकडे तिच्या जवळच्या प्रतिस्पर्ध्याच्या तुलनेत एका गुणाची आघाडी आहे.