माजी मंत्री प्रतीक पाटील यांनी घेतली प्रकाश आंबेडकर यांची भेट; विशाल पाटील यांना उमेदवारी दाखल करण्याचा आंबेडकर यांचा सल्ला
सांगली / प्रतिनिधी
महाविकास आघाडीतून काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष विशाल पाटील यांची उमेदवारी नाकारल्याच्या दुसऱ्याच दिवशी त्यांचे बंधू आणि काँग्रेस पासून अलिप्त असलेले माजी मंत्री प्रतीक पाटील यांनी अकोला येथे वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांची भेट घेतली. या भेटीत आंबेडकर यांनी सांगलीत विशाल पाटील यांनी वंचित बहूजन आघाडीकडून उमेदवारी दाखल करावी असा सल्ला दिला असल्याचे समजते.
गेल्या महिनाभरापासून प्रतीक पाटील हे समाजातील विविध घटकांना खासगीत भेटून विशाल यांच्या उमेदवारीबाबत चाचपणी करत होते. मात्र विशाल यांना आपण कोणताही सल्ला देणार नाही, भाऊ म्हणून त्यांच्या पाठीशी राहणार अशी भूमिका मांडत होते.
शिवसेना आणि काँग्रेसदरम्यान सांगलीच्या जागेवरून सुरू असलेल्या चढाओढीची त्यांनी दिल्लीतील किंवा मुंबईतील नेत्यांशी संपर्क साधलेला नव्हता. विश्वजीत कदम आणि विशाल पाटील यांच्यावर सोपवून प्रतीक पाटील जिल्हाभर फिरत होते.
मंगळवारी गुढीपाडव्याच्या निमित्ताने महाविकास आघाडीचे अंतिम जागा वाटप जाहीर झाले आणि बुधवारी प्रतीक पाटील अचानक सक्रिय झाल्याचे दिसून आले. प्रतीक पाटील आणि प्रकाश आंबेडकर यांची अकोला येथे भेट झाली असून आंबेडकर यांनी सांगलीमध्ये शिवसेनेची ताकद नाही त्यामुळे विशाल पाटील यांनी उमेदवारी करावी असा सल्ला दिला आहे. त्यांना वंचितची उमेदवारी देणार की पुरस्कृत करणार या प्रश्नावर याबाबत त्यांच्या उमेदवारी नंतर ठरवले जाईल अशी भूमिका आंबेडकर यांनी घेतली आहे.