For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

प्रतापसिंह राणेंवर उदंड प्रेमाचा वर्षाव

12:28 PM Jan 29, 2024 IST | Tarun Bharat Portal
प्रतापसिंह राणेंवर उदंड प्रेमाचा वर्षाव
Advertisement

शुभेच्छा देण्यासाठी सत्तरीसह गोव्यातून लोटला जनसागर : उपस्थित मान्यवरांनी विकास व नेतृत्वाबाबत केला गौरव,विजयादेवी राणेंच्या ‘मेकर ऑफ मॉडर्न गोवा’चे प्रकाशन

Advertisement

वाळपई : प्रतापसिंह राणे यांनी मुख्यमंत्रीपदाच्या कारकिर्दीत गोव्याच्या सर्वांगीण विकासाला चालना दिली. त्यांचे कार्य हे वेळेपुरते मर्यादित नव्हते. निसर्गाला अभिप्रेत विकास करणे हे त्यांचे ध्येय होते आणि ते ध्येयापर्यंत यशस्वीपणे पोहोचले. राज्यामध्ये आर्थिक विकासाला चालना मिळावी यासाठी त्यांनी वेगवेगळ्या प्रकारचे प्रकल्प आणले. राणे हे जनतेच्या मनावर राज्य करणारे नेतृत्व आहे. म्हणूनच पन्नास वर्षे त्यांनी अखंडितपणे आमदार म्हणून निवडून येण्याचा इतिहास घडविला. त्यांच्या विचारांमध्ये असलेला आदर्श हा आजच्या राजकारण्यांमध्ये येणे गरजेचे आहे. त्यांनी तऊणांपुढे अनेक सकारात्मक विचारांची ऊर्जा निर्माण केलेली आहे, असे प्रतिपादन माजी केंद्रीय मंत्री सुरेश प्रभू यांनी केले. माजी मुख्यमंत्री प्रतापसिंह राणे यांच्या 85 व्या वाढदिवसानिमित्त त्यांच्या पत्नी विजयादेवी राणे यांनी लिहिलेल्या ‘मेकर ऑफ मॉडर्न गोवा’ पुस्तकाचे 40 हजारांच्या जनसमूदायाच्या साक्षीने प्रकाशन करण्यात आले. येथील भूमिका मैदानावर आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमाला मोठ्या प्रमाणात नागरिकांची उपस्थिती होती. जवळपास सर्वच आमदार, मंत्री, माजी मुख्यमंत्री, सरकारच्या विविध खात्यांचे वरिष्ठ अधिकारी यांची उपस्थिती होती.

राणेंचे कार्य अजरामर राहील

Advertisement

सुरेश प्रभू यांनी सांगितले की राजकीय क्षेत्रात वावरताना दीर्घकाळ नेतृत्व करण्याची संधी सहजासहजी कोणाला मिळत नाही. मात्र ज्या जनतेवर आपण प्रेम केले त्यांच्या प्रलंबित असलेल्या समस्या सोडविण्यासाठी महत्त्वाचे योगदान दिले अशा नेत्यावर विश्वास ठेवणाऱ्या सत्तरी तालुक्मयातील जनतेने राणे यांना ही संधी उपलब्ध करून दिली. त्यांनी अनेक पदांना न्याय दिला. यामुळे येणाऱ्या अनेक वर्षे त्यांचे कार्य हे तऊणापर्यंत अजरामर राहील, असेही प्रभू म्हणाले. याप्रसंगी व्यासपीठावर मुख्यमंत्री प्रमोद सावंत, केंद्रीय पर्यटनमंत्री श्रीपाद नाईक भाजपाचे प्रदेशाध्यक्ष व खासदार सदानंद तानावडे, प्रतापसिंह राणे यांच्या पत्नी विजयादेवी राणे, पुत्र आरोग्यमंत्री विश्वजित राणे, पर्येच्या आमदार तथा प्रतापसिंह यांच्या स्नुषा डॉ. देविया राणे, कन्या विश्वधारा डहाडुणकर यांची उपस्थिती होती.

सर्व पदांना न्याय देणारा नेता : मुख्यमंत्री

आपल्या पन्नास वर्षाच्या कारकिर्दीमध्ये सभापती, मुख्यमंत्री, विरोधी पक्षनेते, आमदार या पदांवर काम करताना प्रतापसिंह यांनी पदांना प्रामाणिक न्याय दिला. पारदर्शकता बाळगली. सभापती असताना त्यांनी घालून दिलेली नियमावली आजही अनेक सभापती वापर करताना दिसतात. राणे यांचे कार्य अनेक वर्षापर्यंत चिरंतन राहील, असे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत म्हणाले.

घटक राज्य ही गोव्यासाठी अमूल्य भेट

प्रतापसिंह राणे यांच्या कारकीर्दीत गोव्याला प्राप्त झालेला घटक राज्याचा दर्जा ही खरोखर अमूल्य भेट होती. हा दर्जा प्राप्त झाल्यानंतर गोव्याच्या विकासाची दिशा शीघ्रगतीने पुढे गेली. त्यांच्या कारकिर्दीत अनेक प्रकल्पांच्या विकासाचा पाया मजबूत झाला. सत्तरीच्या विकासात त्यांचे महत्त्वाचे योगदान आहे. त्यांनी मतदारावर भरभरून प्रेम केले. म्हणूनच त्यांना पन्नास वर्षे राजकारण करण्याची संधी उपलब्ध झाली, असेही मुख्यमंत्री म्हणाले. प्रतापसिंह राणे यांचा विधिमंडळाच्यावतीने दोन वर्षांपूर्वी सन्मान करण्यात आला, याचा उल्लेख यावेळी मुख्यमंत्र्यांनी केला. येणाऱ्या 100 वर्षापर्यंत त्यांचा अनुभव गोव्याच्या सर्वांगीण विकासाच्या दृष्टिकोनातून महत्त्वाचा ठरेल, असे स्पष्ट करून त्यांना सुयश चिंतीले.

राणे संयमाने वागणारे नेते : तानावडे

भाजपाचे प्रदेशाध्यक्ष सदानंद तानावडे यांनी आपले मनोगत व्यक्त करताना सांगितले की प्रतापसिंह राणे यांनी संयमाने विविध पदांना चांगल्याप्रकारे न्याय दिला. मुख्यमंत्री असताना त्यांचे असलेले वागणे व विरोधी पक्षनेतेपदावरुनही त्यांनी चांगल्याप्रकारचे योगदान दिले. जनतेच्या अपेक्षेला पात्र ठरलेले हे व्यक्तिमत्व आहे. त्यांनी केलेल्या कार्याबद्दल आपल्या मनात आनंद आहे. प्रशासनावर मजबूत पकड असलेले हे व्यक्तिमत्व असून अनेक राजकारण्यांसाठी आदर्श ठरणार असल्याचे ते पुढे म्हणाले.

‘मेकर ऑफ मॉडर्न गोवा’ वर्षात पूर्ण : विजयादेवी

मेकर ऑफ मॉडर्न गोवा हे पुस्तक एका वर्षात पूर्ण करण्याचे भाग्य आपल्याला लाभले. प्रतापसिंह राणे हे आदर्शवादी व्यक्तिमत्व आहे. आपल्या संयमी व कणखर भूमिकेमुळे त्यांनी सातत्याने मतदारांच्या हृदयामध्ये आदराचे स्थान प्राप्त केले. त्यांचे आत्मचरित्र समाजासमोर यावे अशी अनेकांची इच्छा होती. मात्र त्यांनी याला पूर्णपणे नकार दिल्यानंतर ही जबाबदारी आपल्यावर आली. सर्वांच्या सहयोगाने ती आपण यशस्वीपणे पार पाडली, अशा भावना पत्नी विजयादेवी राणे यांनी व्यक्त केल्या.

विकासात गोवा अग्रेसर ठरावा : प्रतापसिह

गोव्याचे नेतृत्व कोणीही करो, मात्र विकासाच्या बाबतीत गोव्याचा क्रमांक अव्वल ठरावा अशा प्रकारची भावना प्रतापसिंह राणे यांनी व्यक्त केली. येणाऱ्या काळात अनेक मुख्यमंत्री बनतील. मात्र विकासाच्या बाबतीत गोवा मागे पडू नये. सत्तरी तालुक्मयातील जनतेमुळे आपल्याला हा सुवर्णदिन पाहण्याची संधी उपलब्ध झालेली आहे. जनतेने आपल्याला दिलेले भरभरून प्रेम हे आपल्यासाठी मोठी भेट असल्याचे ते म्हणाले.

विश्वजित राणे झाले भावूक

आरोग्यमंत्री विश्वजित राणे प्रास्ताविक व स्वागत करताना अनेकवेळा भावूक होण्याचा प्रसंग घडला. सत्तरीच्या जनतेने ज्या पद्धतीने प्रतापसिंह राणे यांच्यावर प्रेम केले, विश्वास ठेवला हे खरोखरच महत्त्वाचे आहे. यामुळे सत्तरी तालुक्मयातील जनता हा आपला परिवार आहे असे स्पष्ट करताना ते दोनवेळा भावूक झाले. अनेकवेळा कठीण काळात संघर्ष करावा लागला. मात्र या वटवृक्षासमोर नतमस्तक होताना अनेकवेळा संघर्षातही यशाचा मार्ग सापडला. राणे यांचा प्रवास सर्वांसाठी आत्मविश्वास वाढविणार आहे. वाळपई व पर्ये मतदारसंघाच्या जनतेमुळेच हा सुवर्णदिन पाहण्याची संधी उपलब्ध झाली, असे ते पुढे म्हणाले.

 प्रतापसिंह आदर्शवादी : नाईक

केंद्रीय मंत्री श्रीवाद नाईक यांनी यावेळी आपले मनोगत व्यक्त करताना राणे यांचे अनेक किस्से आपल्या भाषणातून मांडले. आदर्शवादी व्यक्तिमत्व कसे असावे याचे राणे उदाहरण असून त्यांचा आदर्श तऊण पिढीने घेणे अत्यंत गरजेचे आहे. बदलत्या जीवनशैलीमुळे आज विचार बदलू लागलेले आहेत. मात्र अनेक प्रकारची वादळे, संघर्ष आले. मात्र राणे यांनी आपल्या भूमिकेशी सातत्याने ठाम राहण्याचा केलेला निश्चय हा आजच्या तऊण पिढीसमोर खरोखरच महत्त्वाचा आहे, असेही ते म्हणाले. सुऊवातीला पारंपरिक समई प्रज्वलित करून या शानदार कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले. व्यासपीठावरील उपस्थित मान्यवरांचे उदयसिंग राणे, प्रसन्न गावस, रती गावकर, देवयानी गावस, राजश्री काळे, संध्या खाडीलकर, दीक्षा गावस, रोहिदास गावकर व सोमनाथ काळे यांनी पुष्पगुच्छ प्रदान करून स्वागत केले. सूत्रसंचालन सिद्धी उपाध्ये यांनी केले.

हर्षप्रीत कौर यांचा कार्यक्रम रंगला

सुप्रसिद्ध गायक हर्षदीप प्रीत कौर यांचा सुऊवातीला कार्यक्रम चांगलाच रंगला. त्यांनी अनेक गाणी सादर करून उपस्थितांची मने जिंकली. प्रार्थना गीताने या कार्यक्रमाची सुऊवात करण्यात आली. त्यांच्या गायनाने उपस्थित रसिक मंत्रमुग्ध झाले.

हेमा मालिनी यांचे नृत्य रंगले

सिनेसृष्टीमध्ये अनेक वर्ष आपल्या अदाकारीने अनेकांच्या हृदयामध्ये स्थान निर्माण करणाऱ्या हेमामालिनी यांचे नृत्य अत्यंत प्रभावीपणे सादर झाले. हा क्षण पाहण्यासाठी अनेकांनी आपल्या नजरा व्यासपीठाकडे केंद्रित केल्या होत्या. त्यांनी विशिष्ट असा नृत्यप्रकार सादर केला व अनेकांची मने जिंकली. कार्यक्रमाला जवळपास 40 हजारापेक्षा जास्त नागरिकांची व हितचिंतकांची उपस्थिती होती. आरोग्यमंत्री विश्वजित राणे हे भाषण करताना दोनदा भावुक झाले. यावेळी अचानकपणे उपस्थितामध्ये शांतता पसरली. तीन वाजल्यापासून नागरिक व हितचिंतक सभास्थानी येत होते. यामुळे प्रवेश दरावर मोठ्या प्रमाणात गर्दी झाल्याचे चित्र पाहावयास मिळाले त्यावेळी आरोग्य मंत्री विश्वजीत राणे सदर ठिकाणी धावून गेले व त्यांनी गर्दी कमी करण्यास स्वत: हातभार लावला. या कार्यक्रमाला राज्यातील जवळपास सर्वच आमदारांची उपस्थिती होती. त्याचप्रमाणे अनेक मंत्री यांनी उपस्थिती लावून प्रतापसिंह राणे यांना शुभेच्छा दिल्या. माजी आमदार, माजी मुख्यमंत्री, माजी मंत्री, सरकारच्या विविध खात्याचे वरिष्ठ अधिकाऱ्यांची उपस्थिती होती. मेकर ऑफ मॉडर्न गोवा या पुस्तकाचे प्रकाशन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी दारूकामांची आतषबाजी बाजी करण्यात आली.

Advertisement
Tags :

.