For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना बदनाम करण्याचा प्रयत्न सहन करणार नाही; जरांगेंची ऑडिओ क्लिप निवडणुकीच्या तोंडावरच का बाहेर आली? चौकशी झाली पाहिजे : केंद्रीय राज्यमंत्री प्रतापराव जाधव

04:05 PM Oct 25, 2026 IST | Tarun Bharat Portal
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना बदनाम करण्याचा प्रयत्न सहन करणार नाही  जरांगेंची ऑडिओ क्लिप निवडणुकीच्या तोंडावरच का बाहेर आली  चौकशी झाली पाहिजे   केंद्रीय राज्यमंत्री प्रतापराव जाधव
Advertisement
मुंबई | प्रतिनिधी : मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील यांच्याशी संबंधित दीड वर्षांपूर्वीची कथित ऑडिओ क्लिप विधान परिषद निवडणुकीच्या एक दिवस आधीच समोर आणण्यामागे नेमका काय हेतू होता, याची चौकशी झाली पाहिजे, अशी मागणी केंद्रीय राज्यमंत्री आणि शिवसेना नेते प्रतापराव जाधव यांनी केली आहे. या क्लिपमधील कथित संभाषण आणि त्यासंदर्भातील आरोप गंभीर असल्याचे सांगत त्यांनी सत्य जनतेसमोर येण्याची गरज व्यक्त केली.

जाधव म्हणाले की, मनोज जरांगे पाटील यांनी केलेल्या आरोपांची चौकशी झालीच पाहिजे. कथित ऑडिओ क्लिपमध्ये भाजपच्या नेत्यांची किंवा कार्यकर्त्यांची नावे येत असतील, तर भाजपनेच सर्वप्रथम या प्रकरणाच्या चौकशीची मागणी करायला हवी. क्लिप नेमकी कधी आणि कोणत्या उद्देशाने समोर आणण्यात आली, याचाही तपास होणे आवश्यक असल्याचे त्यांनी नमूद केले.

Advertisement

‘एकनाथ शिंदेंना बदनाम करण्याचा प्रयत्न खपवून घेणार नाही’

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर होत असलेल्या टीकेला उत्तर देताना जाधव यांनी त्यांच्या नेतृत्वाचे समर्थन केले. एकनाथ शिंदे यांचे नेतृत्व कमकुवत नसून, त्यांना कोणी सहजपणे बाजूला करू शकत नाही, असे ते म्हणाले. शिंदे आणि त्यांचे पुत्र खासदार श्रीकांत शिंदे यांना बदनाम करण्याचा प्रयत्न होत असल्यास शिवसैनिकांमध्ये नाराजी निर्माण होणे स्वाभाविक असल्याचेही त्यांनी सांगितले.

Advertisement

महाराष्ट्रातील सत्तास्थापनेत एकनाथ शिंदे यांच्या भूमिकेचा उल्लेख करत जाधव म्हणाले की, शिंदे यांनी धाडसी निर्णय घेतल्यामुळेच राज्यात सत्तेची समीकरणे बदलली. भाजपला सत्तेत येण्यासाठी शिंदे यांच्या नेतृत्वाखालील गटाने दिलेल्या पाठिंब्याची महत्त्वाची भूमिका होती. बिहारमध्ये कमी आमदारसंख्या असूनही नितीश कुमार यांना मुख्यमंत्री करण्यात आले होते, याचा दाखला देत त्यांनी भाजपच्या नेतृत्वाच्या निर्णयांवर प्रश्न उपस्थित करणाऱ्यांनी राष्ट्रीय लोकशाही आघाडीच्या (एनडीए) नेतृत्वाच्या निर्णयांवरही आक्षेप घ्यावा, असे म्हटले.

मराठा आरक्षण आंदोलनाला सामाजिक बांधिलकीतून पाठिंबा

मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर भूमिका स्पष्ट करताना जाधव यांनी विदर्भातील मराठा आणि ओबीसी समाजाच्या सामाजिक परिस्थितीचा उल्लेख केला. विदर्भात मराठा आणि ओबीसी समाजातील अनेक लोक एकत्र राहतात. आरक्षणाच्या प्रश्नावर भविष्यात आपल्या समाजातील तरुणांवर परिणाम होण्याची शक्यता असतानाही सामाजिक बांधिलकीच्या भावनेतून आपण जरांगे यांच्या आंदोलनाला विरोध केला नाही, तर पाठिंबा दिला, असे त्यांनी सांगितले.

मराठा समाजाला 10 टक्के आरक्षण देण्याच्या निर्णयाचा उल्लेख करत जाधव यांनी एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील सरकारने यासाठी पुढाकार घेतल्याचे म्हटले. मराठा आरक्षण आणि आंदोलनाशी संबंधित मुद्द्यांवर राजकीय आरोप-प्रत्यारोप करण्याऐवजी वस्तुस्थिती स्पष्ट होणे आवश्यक असल्याचे त्यांनी सूचित केले.

‘सत्य जनतेसमोर आले पाहिजे’

या प्रकरणात कोणाचाही आवाज दाबला जाऊ नये आणि सत्य जनतेसमोर यावे, अशी भूमिका जाधव यांनी मांडली. कथित ऑडिओ क्लिपमधील संभाषणाची सत्यता, ती सार्वजनिक करण्यामागील हेतू आणि त्यातील आरोपांची पार्श्वभूमी यांची सखोल चौकशी होणे गरजेचे असल्याचे त्यांनी सांगितले.

या प्रकरणामुळे राज्यातील राजकीय वातावरण तापले असून, मनोज जरांगे पाटील यांच्या आरोपांची चौकशी आणि कथित ऑडिओ क्लिपची सत्यता याबाबत पुढे काय घडते, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.

Advertisement
Tags :

.