वनडे मालिकेतून प्रसिद्ध कृष्णा बाहेर
भारत अ संघात सिराजचा समावेश
वृत्तसंस्था, नवी दिल्ली
सध्या भारतीय क्रिकेट संघ न्यूझीलंडच्या दौऱ्यावर विविध मालिका खेळत आहे. 4 नोव्हेंबरपासून सुरु होणाऱ्या न्यूझीलंडविरुद्धच्या पाच सामन्यांच्या वनडे मालिकेत वेगवान गोलंदाज प्रसिद्ध कृष्णा दुखापतीमुळे खेळू शकणार नाही. तसेच न्यूझीलंडमध्ये सुरु असलेल्या भारत अ आणि न्यूझीलंड अ यांच्यातील अनधिकृत दुसऱ्या कसोटीसाठी वेगवान गोलंदाज मोहम्मद सिराजचा भारत अ संघात समावेश करण्यात आला आहे.
भारतामध्ये विंडीजविरुद्ध झालेल्या वनडे मालिकेत खेळताना प्रसिद्ध कृष्णाला स्नायू दुखापत झाली होती. यानंतरही न्यूझीलंड दौऱ्यासाठी घोषित करण्यात आलेल्या वनडे संघातही प्रसिद्ध कृष्णाचा समावेश करुन त्याच्या तंदुरुस्ती समस्येवर अवलंबून राहिल, असे सूचित केले होते. मात्र प्रसिद्ध कृष्णाची ही दुखापत अद्याप पूर्णपणे बरी झाली नसल्याने तो या आगामी वनडे मालिकेत उपलब्ध होऊ शकणार नाही, असे सांगण्यात आले आहे. त्याचप्रमाणे 7 नोव्हेंबरपासून खेळविल्या जाणाऱ्या न्यूझीलंड अ संघाविरुद्धच्या तिसऱ्या आणि शेवटच्या सामन्यासाठी भारत अ संघामध्ये प्रसिद्ध कृष्णाचा समावेश करण्यात आला होता. पण त्याची दुखापत अद्याप बरी झाली नसल्याने तो या सामन्यातही खेळू शकणार नाही. आता त्याच्या जागी भारत अ संघात मोहम्मद सिराजचा समावेश करण्यात आला आहे.
भारत आणि न्यूझीलंड यांच्यात होणाऱ्या वनडे मालिकेतील पहिल्या सामन्यासाठी भारतीय संघात अष्टपैलू नितिशकुमार रे•ाrचा समावेश करण्यात आला आहे. या वनडे मालिकेतील पहिल्या तीन सामन्यांसाठी भारतीय संघ खालील प्रमाणे,
शुभमन गिल (कर्णधार), रोहित शर्मा, विराट कोहली, श्रेयस अय्यर, केएल राहुल, अक्षर पटेल, नमन धीर, अनशूल कंबोज, गुरनूर ब्रार, ऋतुराज गायकवाड, अर्शदीप सिंग, ईशान किशन, मोहम्मद सिराज, कुलदीप यादव, नितीशकुमार रेड्डी (केवळ पहिल्या सामन्यासाठी).
