प्रशांत कोरटकरला सशर्त जामीन मंजूर
कोल्हापूर :
छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज, राजमाता जिजाऊ यांच्याबद्दल अवमानकारक वक्तव्य करुन, इतिहास अभ्यास इंद्रजित सावंत यांना ठार मारण्याची धमकी देणाऱ्या प्रशांत कोरटकर याला अखेर बुधवारी जिल्हा व सत्र न्यायालयाने सशर्त जामीन मंजूर केला. सायंकाळी पाच वाजता हा निकाल झाला.जामिनानंतर कारागृहा परिसरात पोलीसांनी चोख बंदोबस्त ठेवला होता.
जिल्हा व सत्र न्यायाधिश डी. व्ही. कश्यप यांच्या न्यायालयात 7 एप्रिल रोजी कोरटकरच्या जामीन अर्जावर दोन्ही बाजूच्या वकीलांनी जोरदार युक्तीवाद केला होता. सरकारी वकील विवेक शुक्ल यांनी कोरटकरला जामीन दिल्यास तो पळून जाईल, तपास कामात अडथळे निर्माण करेल, साक्षीदार फोडले जातील असे मुद्दे उपस्थित करुन कोरटकरच्या जामीनाला विरोध केला. बचाव पक्षाचे वकील अॅड. सौरभ घाग यांनी तपास पूर्ण झाला असून कोरटकरने मोबाईल, सीमकार्ड, पासपोर्ट जमा केला,तपासात सहकार्य केले आहे. तीन वर्षाच्या आतील शिक्षा असल्याने कोरटकर जामीनास पात्र असल्याचा मुद्दा मांडला होता. दोन्ही बाजूच्या युक्तिवादानंतर न्यायालयाने 9 एप्रिल रोजी निकाल ठेवला होता.
बुधवारी सायंकाळी न्यायाधिश डी.व्ही. कश्यप यांनी प्रशांत कोरटकरला जामीन मंजूर केल्याचे जाहीर केले. यावेळी न्यायाधिशांनी काही अटी शर्ती घातल्या आहेत. यात 50 हजार रुपयांच्या जातमुचलक्यावर जामीन, तपासात सहकार्य करणे, पोलीस चौकशीला बोलवतील त्यावेळी हजर राहणे, साक्षीदारांवर दबाव टाकू नये. अशा अटी घातल्या आहेत. कोरटकरच्या वकीलांनी जामीनाची सर्व कागदपत्रे पूर्ण केली.त्यानंतर सायंकाळी उशिरा जामीनाचा लखोटा बचाव पक्षाच्या हातात आला. मात्र रात्री उशिरापर्यंत त्याची कारागृहातून मुक्तता झाली नव्हती.
- अशा गुन्हयासाठी सरकारने जास्तीत जास्त शिक्षेची तरतूद करावी
कोरटकरने छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज अशा महामानवांचा अवमान केला आहे. त्याच्या वक्तव्याने लोकांच्या संतापाचा कडेलोट झाला आहे. मात्र या गुन्हयाला तीन वर्षाची शिक्षा असल्याने कोरटकरला जामीन मिळाला. सरकारने अशा गुन्हयांसाठी तर जास्त शिक्षेची तरतूद करावी.तसेच न्यायालयाने कोरटकला घातलेल्या अटी व शर्तीचे पालन योग्य पध्दतीने झाले पाहिजे. कोरटकरला माझा फोन नंबर कोणी दिला. याचा तपास होणे आवश्यक आहे.त्याने माझ्यावर गुन्हा दाखल असलेले खोटे सांगितल्यामुळे त्याला अब्रु नुकसानीची नोटीस बजावली आहे.यावरही योग्य वेळी निर्णय होईल असे या गुन्हयातील फिर्यादी इतिहास अभ्यासक इंद्रजित सावंत यांनी प्रसिध्दी माध्यमांशी बोलताना सांगितले.
- कळंबा कारागृहाबाहेर गर्दी आणि पोलीस बंदोबस्त
प्रशांत कोरटकरला बुधवारी सायंकाळी पाच वाजता जामीन मिळाला.यामुळे त्याची कारागृहातून मुक्तता होण्याची शक्यता होती.परिणामी कळंबा कारागृहासमोर नागरिकांनी मोठी गर्दी केली होती.यामुळे काहीसा तणाव निर्माण झाला होता.नागरिकांची गर्दी पाहून जुना राजवाडा पोलीसांना पाचारण करण्यात आले होते.यामुळे पोलीस बंदोबस्तही ठेवण्यात आला होता.