For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

प्रशांत कोरटकरच्या मुसक्या आवळल्या

11:15 AM Mar 25, 2025 IST | Pooja Marathe
प्रशांत कोरटकरच्या मुसक्या आवळल्या
Advertisement

कोल्हापूर पोलिसांची तेलंगणा येथे कारवाईः महिन्यापासून होता पसारः आज न्यायालयात हजर करणार

Advertisement

कोल्हापूर

छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज यांच्याबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य करणाऱ्या प्रशांत कोरटकर याच्या मुसक्या आवळण्यात अखेर कोल्हापूर पोलिसांना यश आले. गेल्या चार दिवसांपासून कोल्हापूर पोलिसांची दोन पथके कोरटकरच्या मागावर होती. सोमवारी (२४) रोजी दुपारी ३ वाजण्याच्या सुमारास तेलंगणा येथील मंचरियाल रेल्वेस्टेशन येथून ताब्यात घेण्यात आले. मंगळवारी सकाळी पथक त्याला कोल्हापूरात घेवून येणार असून, यानंतर जिल्हा न्यायालयात हजर करण्यात येणार आहे.

Advertisement

याबाबत अधिक माहिती अशी की, इतिहास संशोधक इंद्रजित सावंत यांनी छावा चित्रपटातील एका मुद्यावरुन एका पोर्टलला मुलाखत दिली होती. यानंतर प्रशांत कोरटकर याने इंद्रजित सावंत यांना २३ फेब्रुवारी रोजी रात्रीच्या सुमारास व्हॉट्सअॅपवर कॉलकरुन धमकी दिली होती. तसेच छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज यांच्याबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य केले होते. याच ऑडिओ क्लिप व्हायरल झाल्यानंतर कोरटकर विरोधात राज्यभर आंदोलन सुरु झाले होते. याची गांभीर्याने दखल घेवून जुना राजवाडा पोलीस ठाण्यात कोरटकर विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. याचसोबत कोरटकर विरोधात बेलतरोडी पोलीस ठाणे नागपूर येथेही गुन्हा दाखल करण्यात आला होता. नागपूर येथील गुन्हा जुना राजवाडा पोलीस ठाण्याकडेच वर्ग करण्यात आला होता. गुन्हा दाखल होताच कोरटकरने पळ काढला होता. त्याने वकीलांकडून जिल्हा व सत्र न्यायालयात अर्ज करुन अंतरिम जामिन मिळवला होता. मात्र आठ दिवसानंतर जिल्हा सत्र न्यायालयाने कोरटकरचा अंतरिम जामिन रद्द केला होता. यानंतर कोल्हापूर पोलीसांचे संयुक्त पथक नागपूरला रवाना झाले होते. नागपूरसह मुंबई, चंद्रपूर आणि इंदौर येथे त्याचा शोध घेतला होता. तो एका वाहनातून तेलंगणात गेल्याचे टोल नाक्यावरील सीसीटीव्ही फुटेज मिळताच पोलिसांनी तेलंगणात त्याचा तपास सुरू केला होता. अखेर मंचरियाल येथील रेल्वे स्टेशनजवळ तो पोलिसांच्या हाती लागला. सोमवारी दुपारी दोन वाजून ४५ मिनिटांनी त्याला ताब्यात घेण्यात आले. मंगळवारी सकाळी हे पथक कोरटकरला घेवून कोल्हापूरात दाखल होणार आहे. यानंतर त्याला जिल्हा न्यायालयात हजर करण्यात येणार असल्याची माहिती पोलीस अधीक्षक महेंद्र पंडीत यांनी दिली.

कोरटकर महिनाभर गायब
२५ फेब्रुवारी रोजी गुन्हा दाखल होताच कोरटकर पसार झाला होता. गेले महिनाभर तो पोलिसांना गुंगारा देत होता. कोल्हापूर पोलिसांचे एक पथक गुन्हा दाखल होताच कोरटकरच्या मागावर गेले होते. मात्र याच दरम्यान कोरटकरने अंतरिम जामीन मिळवल्यानंतर पथक परत आले होते. मात्र अंतरिम जामिन रद्द झाल्यानंतर पुन्हा पथक कोरटकरच्या मागावर गेले आणि त्याला जेरबंद करण्यात आले.

उच्च न्यायालयातील अर्ज रद्द
जिल्हा व सत्र न्यायालयाने कोरटकरचा अंतरिम जामिन रद्द केल्यानंतर त्याने उच्च न्यायालयात अर्ज दाखल केला होता. उच्च न्यायालयात सोमवारी (दि. २४) दुपारी चार वाजता सुनावणी होणार होती. मात्र तत्पूर्वीच त्याला अटक झाल्याने न्यायालयाने त्याचा अर्ज रद्द केला.

मदत करणाऱ्यांवरही होणार कारवाई
गेल्या महिन्यापासून कोरटकर आपले ठिकाण वारंवार बदलत होता. गेल्या महिनाभरात कोरटकर मुंबई, चंद्रपूर, पश्चिम बंगाल येथे गेल्याच्या चर्चा सुरू होत्या. तो दुबईला पळाल्याच्या बातम्या प्रसार माध्यमात येताच त्याच्या पत्नीने पासपोर्ट कोल्हापूर पोलिसांच्या पथकाच्या ताब्यात दिला. या काळात त्याला आश्रय देणाऱ्यांवरही कायदेशीर कारवाई करणार असल्याची माहिती पोलीस अधीक्षक महेंद्र पंडीत यांनी दिली.

अखेर कोल्हापूर पोलिसांनीच मुसक्या आवळल्या
प्रशांत कोरटकर याला राजकीय आश्रय असल्याची टिका करण्यात येत होती. कोल्हापूर पोलिसांचे जुना राजवाडा आणि स्थानिक गुन्हे अन्वेषणची पथके दोन वेळा त्याच्या मागावर होते. अखेर कोल्हापूर पोलिसांनीच कोरटकरला अटक करुन दाखविले. पोलीस अधीक्षक महेंद्र पंडीत यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक रविंद्र कळमकर, पोलीस निरीक्षक संजीवकुमार झाडे, पोलीस उपनिरीक्षक शेष मोरे, संतोष गळवे, सुशील पाटील, सुरेश पाटील, रुपेश माने, रामचंद्र कोळी, वैभव खोत, निलेश नाझरे, अतुल देसाई, रोहित टिपुगडे यांनी ही कारवाई केली.

औषधांच्या डब्यासोबत फिरत होता कोरटकर
कोरटकरकडे कोट्यावधी रुपयांची संपत्ती असल्याचा दावा अॅङ आसिम सरोदे यांनी न्यायालयात केली होती. मात्र गुन्हा दाखल होताच कोरटकर पसार झाला होता. त्याला अटक केल्यानंतर त्याच्याजवळ एक बॅग आढळून आली. यामध्ये काही कपडे आणि औषधांचा डबा सापडून आला.

Advertisement
Tags :

.