प्रशांत किशोर यांची प्रकृती बिघडली
आयसीयूमध्ये दाखल : पत्नीला दिल्लीतून बोलाविले
वृत्तसंस्था/ पाटणा
जनसुराज पक्षाचे संस्थापक प्रशांत किशोर यांची 2 जानेवारीपासून सुरू असलेल्या उपोषणाच्या सहाव्या दिवशी प्रकृती बिघडली आहे. 6 दिवसांपासून केवळ पाणी पित राहिल्याने त्यांची प्रकृती गंभीर झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले आहे. प्रशांत किशोर यांना पाटणा येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले असून जेथे त्यांच्यावर आयसीयूत उपचार केले जात आहेत. तर उपोषण जारी ठेवण्यावर ठाम प्रशांत किशोर हे औषधांचे सेवन करण्यास नकार देत आहेत. यामुळे त्यांची पत्नी डॉक्टर जान्हवी दास यांना दिल्लीतून बोलाविण्यात आले आहे. योग्य उपचारासाठी प्रशांत किशोर यांना तयार करण्यासाठी त्यांच्या पत्नीची मदत घेतली जाणार आहे.
प्रशांत किशोर यांनी न्यायालयाच्या आदेशावर मुक्तता झाल्यावर सोमवारी रात्री प्रसारमाध्यमांना संबोधित केले होते. माझे उपोषण जारी असून जारी राहणार असल्याचे त्यांनी म्हटले होते. जनसुराजच्या बॅनर अंतर्गत ते स्वत:चे उपोषण राज्यातील सर्व जिल्ह्dयांमध्ये पोहोचविणार होते. परंतु सोमवारी रात्रीपासून तीव्र पोटदुखी सुरू झाल्यावर डॉक्टरांनी त्यांना रुग्णालयात दाखल होण्याचा सल्ला दिला होता.
प्रशांत किशोरांना डॉक्टरांनी एका रुग्णालयात नेत चाचणी केली असता त्यांच्या पोटात संक्रमण फैलावल्याचे निदान समोर आले. कमी पाणी पिणे आणि अन्नग्रहण न केल्यामुळे ही समस्या निर्माण झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले आहे. प्रशांत किशोर हे उपोषणावर असल्याने ते औषधांचेही सेवन करण्यास नकार देत आहेत. याचमुळे आता प्रशांत किशोर यांची पत्नी आणि बहिणीला बोलाविण्यात आले आहे. त्या दोघीही पाटण्यात राहत नसल्याने त्या पोहोचण्याची प्रतीक्षा डॉक्टर करत होते. तर रुग्णालयाच्या इमर्जन्सी वॉर्डमध्ये बाहेरील लोकांच्या प्रवेशावर बंदी घालण्यात आली आहे.
बिहार लोकसेवा आयोगाची 70 वी संयुक्त प्रारंभिक परीक्षा रद्द करत ती पुन्हा आयोजित करण्याच्या मागणीवरून आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांच्या समर्थनार्थ प्रशांत किशोर यांनी पाटण्यातील गांधी मैदानात 2 जानेवारी रोजी उपोषण सुरू केले होते. तर याप्रकरणी प्रशासनाने प्रशांत किशोर यांच्या विरोधात दोन गुन्हे नोंद केले होते. याच प्रकरणी पोलिसांनी सोमवारी सकाळी त्यांना अटक केली होती. प्रथम त्यांना सशर्त जामीन मंजूर झाला होता, परंतु त्यांनी अटीचे पालन करण्यास नकार दिला होता. यानंतर न्यायालयाने जामिनाच्या अटी हटविल्या होत्या.