प्रशांत किशोर यांचे निवडणूक व्यवस्थापन कोलमडले
तरारीत उमेदवार बदलणार जन सुराज
वृत्तसंस्था/ पाटणा
निवडणूक व्यूहनीतिकार म्हणून देशभरात ख्याती कमाविलेले प्रशांत किशारे यांचे निवडणूक व्यवस्थाप जन सुराज पक्षाच्या पहिल्या निवडणूक परीक्षेतच अपयशी ठरले आहे. प्रशांत किशोर यांनी भोजपूरच्या तरारी विधानसभा मतदारसंघातील पोटनिवडणुकीत निवृत्त लेफ्टनंट जनरल श्रीकृष्ण सिंह यांना उमेदवारी जाहीर केली होती. परंतु श्रीकृष्ण सिंह हे बिहारचे मतदारच नसल्याने त्यांना ही पोटनिवडणूक लढविता येणार नाही. यामुळे जनसुराज पक्षाने उमेदवार बदलण्याचा निर्णय घेतला आहे.
प्रशांत किशारे हे मंगळवारी आरा येथे नव्या उमेदवाराचे नाव जाहीर करणार आहेत. श्रीकृष्ण सिंह हे मूळचे भोजपूरच्या करथ गावचे रहिवासी आहेत. परंतु दिल्लीतील मतदारयादीत त्यांचे नाव आहे. उमेदवारी जाहीर केल्यावर श्रीकृष्ण सिंह यांना निवडणूक लढविता येणार नसल्याचे स्पष्ट झाल्याने प्रशांत किशोर यांच्या निवडणूक व्यवस्थापनाबद्दल प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.
प्रशांत किशोर आणि त्यांचा नवा राजकीय पक्ष जनसुराजसाठी हा मोठा झटका आहे, कारण 2025 च्या बिहार निवडणुकीपूर्वी तरारी, बेलगांज, इमागगंज आणि रामगढ मतदारसंघातील पोटनिवडणूक लढविण्याची घोषणा पक्षाने केली होती. चार उमेदवारांच्या निवडीतच पक्षाच्या व्यवस्थेतील त्रुटी समोर आल्या आहेत.
भाकप-मालेचे नेते सुदामा प्रसाद हे आरा लोकसभा मतदारसंघातून विजयी झाल्याने तरारी विधानसभा मतदारसंघात पोटनिवडणूक होत आहे. भाजपने या पोटनिवडणुकीकरता बाहुबली आमदार सुनील पांडे यांचे पुत्र प्रशांत पांडे यांना उमेदवारी दिली आहे. महाआघाडीच्या वतीने भाकप-मालेचे नेते राजू यादव उमेदवार असणार आहेत.