प्रशांत किशोर तुरुंगातही उपोषणावर ठाम
अटकेनंतर जामीन घेण्यास नकार : विद्यार्थ्यांच्या मागण्यांसाठी आंदोलनात सहभागी
वृत्तसंस्था/ पाटणा
पाटणा येथील गांधी मैदानावर बेमुदत उपोषणाला बसलेले जन सुराज्यचे प्रमुख प्रशांत किशोर यांना पाटणा पोलिसांनी सोमवारी पहाटे अटक केली. त्यानंतर त्यांना न्यायालयाकडून अटी-शर्थींवर जामीन मंजूर करण्यात आला. तथापि, न्यायालयाने घातलेल्या अटींमुळे त्यांनी जामीन घेण्यास नकार दर्शवत तुरुंगातही आमरण उपोषण कायम ठेवण्याचा निर्धार व्यक्त केला आहे. तरुणांवर होत असलेल्या अन्यायाविरुद्ध आवाज उठवणे गुन्हा असेल तर तुरुंगात जाणे मान्य आहे, असे ते म्हणाले.
प्रशांत किशोर यांनी राज्याच्या राजधानीत सुरू असलेल्या बिहार लोकसेवा आयोगाच्या (बीपीएससी) परीक्षेच्या निषेधार्थ सुरू असलेल्या आंदोलनात सहभाग घेतला होता. आंदोलन करत असताना पोलिसांनी हस्तक्षेप करून त्यांना तेथून हटवले आणि अटक केली. प्रशांत किशोर यांना अटक केल्यानंतर त्यांना न्यायालयात हजर करण्यात आले. त्यांना पाटणा न्यायालयातून जामीन मिळाला. पण त्यांनी हा जामीन घेण्यास नकार दिला. आता तुरुंगातही त्यांचे आमरण उपोषण सुरू राहणार आहे. दिवाणी न्यायालयाने त्यांना सशर्त जामीन मंजूर केला होता. त्यात प्रशांत किशोर यांना आंदोलनात सहभागी होण्यास बंदी घातली होती. प्रशांत किशोर सशर्त जामीन घेण्यास नकार देत होते मात्र त्यांचे वकील त्यांना समजावण्याचा प्रयत्न करत होते.
प्रशांत किशोर यांना पोलिसांनी जबरदस्तीने उचलून रुग्णालयात नेले, असे जन सुराज्य पक्षाच्यावतीने प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे. पोलिसांनी प्रशांत यांच्यावर थप्पड मारल्याचा आरोपही करण्यात आला. तसेच त्यांचा चष्मा फेकल्याचाही दावा एका समर्थकाने केला. यासंबंधीचे व्हिडिओही समोर आले आहेत.
प्रशांत किशोर यांच्यासह एकूण 43 जणांना ताब्यात घेण्यात आले. तसेच 15 वाहने जप्त करण्यात आली आहेत. रविवारी प्रशांत किशोर पाटणा येथील गांधी मैदानावर आंदोलक विद्यार्थ्यांसोबत बसले होते. त्यांनी राष्ट्रीय जनता दलाचे नेते तेजस्वी यादव यांना आंदोलनाचे नेतृत्व करण्याचे आवाहनही केले होते.