सौंदत्ती यल्लम्मा मंदिर विकासासाठी ‘प्रसाद’
केंद्र सरकारकडून 18.37 कोटींच्या निधीची घोषणा : खासदार बोम्माईंनी मानले आभार
बेंगळूर : कर्नाटक, महाराष्ट्रासह शेजारील राज्यांतील भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या सौंदत्ती रेणुका यल्लमा मंदिराचा विकास साधण्यासाठी राज्य सरकारने मोठ्या प्रमाणावर तरतूद केली आहे. आता केंद्र सरकारनेही तीर्थक्षेत्र पुनरुज्जीवन आणि अध्यात्मिक वारसा वृद्धी मोहीम (प्रसाद) योजनेंतर्गत रेणुका यल्लम्मा मंदिराचा विकास करण्याची घोषणा मंगळवारी केली आहे. याकरिता 18.37 कोटी रुपयांचा निधी दिला जाणार आहे. याबद्दल माजी मुख्यमंत्री व खासदार बसवराज बोम्माई यांनी केंद्र सरकारचे आभार मानले आहेत.
‘प्रसाद’ योजनेंतर्गत श्री रेणुका यल्लम्मा मंदिर विकास योजनेला मंजुरी दिल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय सांस्कृतिक आणि पर्यटनमंत्री गजेंद्रसिंग शेखावत यांना बसवराज बोम्माई यांनी धन्यवाद दिले आहेत. केंद्र सरकारचा उपक्रम या तीर्थक्षेत्राला भेट देणाऱ्या भाविकांना अनुकूल ठरेल. भाविकांसाठी आधुनिक सुविधा उपलब्ध होतील, असे त्यांनी म्हटले आहे.
केंद्र सरकारच्या पर्यटन मंत्रालयाने प्रसाद योजनेंतर्गत कर्नाटकातील सौंदत्ती येथील श्री रेणुका यल्लम्मा मंदिर विकासाला मंजुरी दिल्याची घोषणा केंद्रीय मंत्री गजेंद्रसिंग शेखावत यांनी ‘एक्स’ अकाऊंटवर जाहीर केले आहे. या योजनेकरिता 18.37 कोटी रुपये देण्यात आले आहेत. या अनुदानाचा वापर भाविक आगमन केंद्र, उपाहारगृह, प्रथमोपचार केंद्र आणि इतर आधुनिक सुविधा पुरविण्यासाठी केला जाणार आहे.