प्रणॉय, मालविका विजयी, लक्ष्य सेन पहिल्याच फेरीत पराभूत
मिश्र दुहेरीत तनिशा-ध्रुव, सतीश कुमार-आद्याची आगेकूच
वृत्तसंस्था/ कौलालंपूर
भारताचा नंबर दोनचा बॅडमिंटनपटू एचएस प्रणॉय व मालविका बनसोड यांनी येथे सुरू झालेल्या मलेशिया ओपन सुपर 1000 बॅडमिंटन स्पर्धेत विजयी सलामी देत उपउपांत्यपूर्व फेरीत स्थान मिळविले. मात्र अव्वल खेळाडू लक्ष्य सेनचे आव्हान पहिल्याच फेरीत समाप्त झाले.
भारताच्या मिश्र दुहेरीच्या जोड्यांनीही विजयी प्रारंभ केला असून तनिशा व्रॅस्टो-ध्रुव कपिला आणि सतीश कुमार करुणाकरन-आद्या वरियात यांनी उपउपांत्यपूर्व फेरी गाठली आहे. बॅडमिंटन कोर्टवरील छतातून गळती होऊ लागल्याने प्रणॉयचा सामना लांबणीवर टाकण्यात आला होता. त्याची दुरुस्ती झाल्यानंतर सामना पुढे खेळविण्यात आला आणि प्रणॉयने कॅनडाच्या ब्रायन यांगवर 21-12, 17-21, 21-15 अशी मात केली. आदल्या दिवशी सामना थांबवण्यात आला तेव्हा प्रणॉयने पहिला गेम 21-12 असा जिंकला होता आणि दुसऱ्या गेममध्ये तो 9-11 असा पिछाडीवर पडला होता. दुसरा गेम गमविल्यानंतरही प्रणॉयने विचलित न होता निर्णायक गेम जिंकून आगेकूच केली. ही लढत दीड तास रंगली होती. प्रणॉयची पुढील लढत चीनच्या सातव्या मानांकित शि फेंग लि याच्याशी होईल. शि पेंगने पहिल्या फेरीत भारताच्या प्रियांशू राजावतचा 21-11, 21-16 असा पराभव केला.
महिला एकेरीत स्थानिक खेळाडू गोह जिन वेईवर भारताच्या मालविका बनसोडने 21-15, 21-16 अशी केवळ 45 मिनिटांत मात केली. तिची पुढील लढत तिसरी मानांकित चीनची युइ हान व दक्षिण कोरियाची यु पो पाय यापैकी एकीशी होईल. महिला दुहेरीत मात्र रुतुपर्णा व श्वेतपर्णा पांडा यांना थायलंडच्या बेनयापा व नन्ताकम ऐमसार्द यांच्याकडून 17-21, 10-21 असा पराभव स्वीकारावा लागला.
मिश्र दुहेरीत ध्रुव कपिला व तनिशा क्रॅस्टो यांनी दक्षिण कोरियाच्या सुंग ह्युन को व ह्यो वोन इओम यांचा 21-13, 21-14 असा पराभव केला. शेवटच्या सोळा फेरीत त्यांचा मुकाबला चीनच्या सातव्या मानांकित शिंग चेंग व चि झँग यांच्याशी होईल. मिश्र दुहेरीच्या अन्य एका सामन्यात सतीश कुमार व आद्या यांनी आपल्याच देशाच्या असित सूर्या व अमृता प्रमुथेश यांच्यावर 21-13, 21-15 अशी मात केली. चौथ्या मानांकित मलेशियाच्या सून हुआत गोह व शेवॉन जेमी लाय यांच्याशी त्यांची पुढील लढत होईल.
लक्ष्य सेन पराभूत
पुरुष एकेरीतील भारताचे आशास्थान असणाऱ्या लक्ष्य सेनला पहिल्याच फेरीत पराभवाचा धक्का बसला. लखनौमध्ये झालेल्या सय्यद मोदी इंटरनॅशनल स्पर्धेत जेतेपद मिळविलेल्या व किंग चषक आंतरराष्ट्रीय स्पर्धेत तिसरे स्थान मिळविणाऱ्या लक्ष्यला तो जोम येथे कायम राखता आला नाही. चिनी तैपेईच्या चि युजेनकडून त्याला 14-21, 7-21 असा पराभव पत्करावा लागला. लक्ष्यने या सामन्यात अनेक अनियंत्रित चुका केल्या, त्याचा लाभ युजेनने अचूक उठवित विजय मिळविला.