For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

तीन शंकराचार्यांकडून प्राणप्रतिष्ठा कार्यक्रमाचे समर्थन; केवळ ज्योतिर्पीठाच्या शंकराचार्यांनी विरोध

06:55 AM Jan 13, 2024 IST | Tarun Bharat Portal
तीन शंकराचार्यांकडून प्राणप्रतिष्ठा कार्यक्रमाचे समर्थन  केवळ ज्योतिर्पीठाच्या शंकराचार्यांनी विरोध
Advertisement

वृत्तसंस्था / नवी दिल्ली

Advertisement

श्रृंगेरी पीठ, पुरी पीठ आणि द्वारका पीठ अशी तीन शंकराचार्यांनी अयोध्येत 22 जानेवारीला होणाऱ्या भगवान रामलल्ला यांच्या प्राणप्रतिष्ठा कार्यक्रमाचे समर्थन केले आहे. आमचा या कार्यक्रमाला कोणताही विरोध नाही असे त्यांनी स्पष्ट केले आहे. त्यांच्यापैकी पुरी पीठाचे शंकराचार्य आणि द्वारका पीठाचे शंकराचार्य यांनी या कार्यक्रमाच्या समर्थनार्थ प्रकट निवेदन केलेले आहे, तर पुरी पीठाच्या शंकराचार्यांनीही नंतर या कार्यक्रमाला समर्थन दिल्याचे वृत्त आहे.

या चारही प्रमुख पीठांचे शंकराचार्य 22 जानेवारीच्या कार्यक्रमाला उपस्थित राहणार नाहीत. मात्र, आम्ही नंतरच्या काळात भगवान रामलल्ला यांच्या दर्शनासाठी आवश्य जाऊ. असे चारही शंकराचार्यांनी स्पष्ट केले आहे. तीन पीठांच्या शंकराचार्यांनी कार्यक्रमात कोणतीही खोट काढलेली नाही. केवळ ज्योतिर्पीठाच्या शंकराचार्यांनी विरोध केलेला आहे. त्यांच्या विरोधाचे कारण वेगळे आहे, असे राममंदिर निर्माण न्यासाच्या प्रमुखांनी शुक्रवारी प्रतिपादन केले.

Advertisement

सनातन धर्माच्या अनुयायांना अत्यानंद

भगवान रामलल्ला यांची प्राणप्रतिष्ठा अयोध्येच्या मंदिराच्या गर्भगृहात होत आहे. ही घटना सनातन धर्माच्या सर्व अनुयायांसाठी अत्यानंदाचीच आहे. आमचे या कार्यक्रमाला पूर्ण समर्थन आहे. शंकराचार्यांनी केलेल्या विधानासंबंधी जी वृत्ते काही वृत्तपत्रांमधून प्रसिद्ध करण्यात आली आहेत, ती खोडसाळ असून अशा वृत्तांना शंकराचार्यांनी अनुमती दिलेली नाही, असेही द्वारका पीठाचे शंकराचार्य स्वामी सदानंद सरस्वती आणि श्रृंगेरी पीठाचे शंकराचार्य स्वामी भारती तीर्थ यांनी एका निवेदनाद्वारे स्पष्ट केले आहे. प्राणप्रतिष्ठा कार्यक्रमाच्या संदर्भात आम्ही मुळातच कोणतेही विधान केलेले नव्हते. सनातन धर्माच्या शत्रूंनी आमच्या तोंडी काही विधान घालून गोंधळ निर्माण करण्याचा प्रयत्न केला, असेही स्पष्टीकरण श्रृंगेरी शंकराचार्य स्वामी भारती तीर्थ यांनी स्वतंत्र निवेदनाद्वारे केले आहे.

ज्योतिर्पीठाच्या शंकराचार्यांचे कारण वेगळे ?

ज्योतिर्पीठाचे शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद सरस्वती यांनी या कार्यक्रमाला विरोध करण्याचे कारण वेगळेच आहे, अशी चर्चा आहे. 2019 च्या लोकसभा निवडणुकीत या शंकराचार्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या विरोधात रामराज्य परिषदेच्या उमेदवाराला पाठिंबा घोषित केला होता. तथापि, या उमेदवाराचा अर्ज अवैध ठरला. त्यावेळी या शंकराचार्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर टीका केली होती. आज याच वादापोटी त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होणाऱ्या प्राणप्रतिष्ठा कार्यक्रमाला विरोध केला असावा, असेही अनेकांचे मत आहे.

Advertisement
Tags :

.