प्रणव मुखर्जी यांचे स्मारक राजघाटावर
वृत्तसंस्था / नवी दिल्ली
भारताचे दिवंगत माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांचे स्मारक राजघाटावर करण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे. हे स्मारक राजघाटावरील ‘राष्ट्रीय स्मृती संकुला’त निर्माण पेले जाणार आहे. या निर्णयासंबधी माहिती देणारे पत्र प्रणव मुखर्जी यांच्या कन्या शर्मिष्ठा यांना पाठविण्यात आले आहे. हे 1 जानेवारीचे पत्र असून ते मुखर्जी यांनीच मंगळवारी प्रसिद्ध केले आहे. शर्मिष्ठा मुखर्जी यांनी या निर्णयासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आभार मानले आहेत.
त्यांनी मंगळवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी दूरध्वनीवरुन संपर्क केला आणि या निर्णयासंबंधी कृतज्ञता व्यक्त केली. आमच्याकडून अशा स्मारकाची मागणी केली गेली नव्हती. तरीही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सरकारकडून हा निर्णय घेण्यात आला, हे अतिशय महत्वाचे आहे. आपले पिता प्रणव मुखर्जी यांनी नेहमीच पुरस्कारासंबंधी अनुत्सुकता दर्शविली होती. सन्मान आणि पुरस्कार यांची मागणी करायची नसते. पुस्कार देणाऱ्यांनी स्वत:हून ते द्यायचे असतात, हे प्राण्व मुखर्जी यांचे तत्व होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हा निर्णय घेऊन आपल्या पित्याचा यथोचित सन्मान केला आहे, असा संदेश मुखर्जी यांनी ‘एक्स’ वर पोस्ट केला आहे. प्रणव मुखर्जी यांचे निधन 31 ऑगस्ट 2020 या दिवशी झाले होते.