For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

एसटी राजकीय आरक्षणासाठी मुख्यमंत्री डॉ. सावंत दिल्लीत दाखल; उच्चस्तरीय शिष्टमंडळाकडून कायदेशीर रणनीतीवर चर्चा

09:50 AM Nov 02, 2026 IST | Tarun Bharat Portal
एसटी राजकीय आरक्षणासाठी मुख्यमंत्री डॉ  सावंत दिल्लीत दाखल  उच्चस्तरीय शिष्टमंडळाकडून कायदेशीर रणनीतीवर चर्चा
Advertisement
पणजी : गोव्यातील अनुसूचित जमातीच्या (एसटी) समाजाला विधानसभा निवडणुकीत राजकीय आरक्षण मिळवून देण्यासाठी मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्यासह एसटी समाजाचे नेते उच्चस्तरीय शिष्टमंडळ घेऊन नवी दिल्लीत दाखल झाले आहेत. हे शिष्टमंडळ भारताचे सॉलिसिटर जनरल तुषार मेहता यांची भेट घेणार असून, आरक्षणाच्या मार्गातील कायदेशीर अडथळे दूर करण्याबाबत चर्चा करणार आहे.

गोवा खंडपीठाच्या मुंबई उच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशामुळे एसटी समाजाला राजकीय आरक्षण देण्याच्या प्रक्रियेत कायदेशीर पेच निर्माण झाला आहे. या आदेशाला केंद्र सरकारने सर्वोच्च न्यायालयात आव्हान द्यावे, अशी मागणी शिष्टमंडळाकडून करण्यात येणार आहे. यासाठी दिल्लीतील विविध नेत्यांच्या भेटी घेऊन पुढील कायदेशीर लढाईची दिशा निश्चित करण्याचा प्रयत्न केला जाणार आहे.

Advertisement

मुख्यमंत्री डॉ. सावंत यांच्यासोबत आदिवासी कल्याणमंत्री रमेश तवडकर, विधानसभा सभापती गणेश गावकर, आमदार गोविंद गावडे, एनआरआय आयुक्त नरेंद्र सावईकर तसेच एसटी समाज संघटनेचे प्रमुख नेते आणि काही कायदेतज्ज्ञ दिल्लीला पोहोचले आहेत. राजकीय आरक्षणासाठी पुढील कायदेशीर रणनीती काय असावी, यावर या बैठकीत चर्चा होणार आहे.

दरम्यान, 2027 च्या विधानसभा निवडणुकीत एसटी समाजाला राजकीय आरक्षण मिळवून देणारच, असा पुनरुच्चार मुख्यमंत्री डॉ. सावंत यांनी यापूर्वी अनेकदा केला आहे. सॉलिसिटर जनरल तुषार मेहता यांच्यासोबतच्या चर्चेनंतर या प्रकरणात पुढील कोणती पावले उचलली जाणार, हे स्पष्ट होणार आहे.

Advertisement

Advertisement
Tags :

.