For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

देवदूत ठरले मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत! अपघातातील जखमी युवकावर स्वतः केले प्रथमोपचार; वाचवले प्राण

10:19 AM Oct 29, 2026 IST | Tarun Bharat Portal
देवदूत ठरले मुख्यमंत्री डॉ  प्रमोद सावंत  अपघातातील जखमी युवकावर स्वतः केले प्रथमोपचार  वाचवले प्राण
Advertisement
डिचोली : डॉक्टरकीचा पेशा सोडून इतर जबाबदाऱ्या स्वीकारल्या, तरी रुग्णसेवेची भावना कधीही संपत नाही, याचा प्रत्यय मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी पुन्हा एकदा दिला. न्हावेली-साखळी येथे त्यांच्या समक्ष झालेल्या अपघातात गंभीर जखमी झालेल्या युवकावर त्यांनी स्वतः तातडीने प्रथमोपचार केले. डोक्यातून होणारा रक्तस्राव रोखण्यासाठी वेळीच मदत करत त्यांनी जखमी युवकाला उपचारासाठी रुग्णालयात पाठवले. मुख्यमंत्र्यांच्या या तत्परतेमुळे युवकाला वेळेत वैद्यकीय मदत मिळाली.

बुधवारी सकाळी मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत आपल्या ताफ्यासह पणजीच्या दिशेने जात असताना न्हावेली-साखळी येथील बेताळ मंदिराजवळ अचानक रस्त्यावर गुरे धावून आली. यामुळे दुचाकीवरून प्रवास करणाऱ्या वेळगे येथील सुदेश वैळगेकर याचा अपघात झाला. या अपघातात तो रस्त्यावर पडल्याने त्याच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली आणि मोठ्या प्रमाणात रक्तस्राव सुरू झाला.

Advertisement

मुख्यमंत्र्यांनी तातडीने केली मदत

अपघाताचे दृश्य दिसताच मुख्यमंत्री डॉ. सावंत यांनी क्षणाचाही विलंब न करता आपल्या वाहनातून उतरून जखमी युवकाकडे धाव घेतली. डॉक्टर म्हणून असलेल्या अनुभवाचा उपयोग करत त्यांनी युवकाच्या डोक्याला पट्टी बांधून रक्तस्राव रोखण्याचा प्रयत्न केला. गंभीर परिस्थितीत वेळेवर प्रथमोपचार मिळणे महत्त्वाचे असल्याने त्यांनी तातडीने पुढील उपचारांची व्यवस्थाही केली.

जखमी युवकाला रुग्णालयात नेण्यासाठी 108 रुग्णवाहिकेला बोलावण्यात आले. मात्र, रुग्णवाहिका तातडीने उपलब्ध न झाल्याने मुख्यमंत्र्यांनी आपल्या ताफ्यातील वाहनातून युवकाला बेतकी आरोग्य केंद्रात पाठवण्याची व्यवस्था केली. तेथून त्याला पुढील उपचारांसाठी बांबोळी येथील गोवा वैद्यकीय महाविद्यालयाच्या रुग्णालयात (गोमेकॉ) दाखल करण्यात आले.

Advertisement

युवकाची प्रकृती स्थिर

गोमेकॉमध्ये युवकावर उपचार सुरू झाल्यानंतर मुख्यमंत्री डॉ. सावंत यांनी त्याच्या प्रकृतीची विचारपूस केली. युवकाची प्रकृती स्थिर असून तो धोक्याबाहेर असल्याचे समजल्यानंतर मुख्यमंत्र्यांनी समाधान व्यक्त केले.

अपघातानंतर तातडीने मदतीसाठी धावून जाणे, जखमीवर प्राथमिक उपचार करणे आणि त्याला रुग्णालयात पोहोचवण्यासाठी स्वतःच्या ताफ्यातील वाहन उपलब्ध करून देणे, या कृतीतून डॉ. प्रमोद सावंत यांनी मुख्यमंत्री आणि डॉक्टर अशा दोन्ही भूमिकांना साजेसे काम केले. संकटाच्या क्षणी पदापेक्षा माणुसकी आणि कर्तव्याला प्राधान्य देणाऱ्या त्यांच्या या कृतीची गोव्यात चर्चा होत आहे.

Advertisement
Tags :

.