प्रमोद पालेकर, आनंद अकादमीचा विजय
बालाजी चषक 13 वर्षांखालील क्रिकेट स्पर्धा
क्रीडा प्रतिनिधी/ बेळगाव
प्रमोद पालेकर अकादमी आयोजित बालाजी चषक 13 वर्षांखालील आंतरक्लब क्रिकेट स्पर्धेत प्रमोद पालेकर अकादमीने साई स्पोर्ट्स अकादमीचा 38 धावांनी तर आनंद अकादमीने एसकेई अकादमीचा 70 धावांनी पराभव करुन विजयी सलामी दिली. शिवकुमार दोडमनी व रोशन यांना सामनावीर पुरस्कार देण्यात आला.
एसकेई प्लॅटिनम ज्युब्ली मैदानावरती बालाजी चषक स्पर्धेच्या उद्घाटन प्रसंगी दीपक पवार, प्रसाद तेंडोलकर, विवेक पाटील, प्रमोद जपे, प्रमोद पालेकर, संदीप सिंग, मुरगेश अलाबाल यांच्या हस्ते यष्टीचे पूजन करुन करण्यात आले. पहिल्या सामन्यात प्रमोद पालेकर अकादमीने प्रथम फलंदाजी करताना 25 षटकात 5 गडी बाद 132 धावा केल्या. त्यात सामजीने 28, मोहीत कुंभारने 18, अनय सांबरेकरने 16 तर केदारनाथने 11 धावा केल्या. साई स्पोर्ट्सतर्फे आर्य चव्हाणने 2, आयुष, श्रेयश पाटील यांनी प्रत्येकी 1 गडी बाद केला. प्रत्युत्तरादाखल खेळताना साई स्पोर्ट्स अकादमीचा डाव 22.2 षटकात 94 धावांत आटोपला. त्यात अमीत ए.ने 3 चौकारांसह 25, विवीन शेरेगारने 15 तर श्रेयश पाटीलने 10 धावा केल्या. शिवकुमार दोडमनीने 9 धावांत 3, अनय सांबरेकरने 5 धावांत 2, केदारनाथ व श्लोक यांनी प्रत्येकी 1 गडी बाद केला.
दुसऱ्या सामन्यात आनंद अकादमीने प्रथम फलंदाजी करताना 25 षटकात 8 गडी बाद 147 धावा केल्या. ओजस दर्शनजीने 8 चौकारांसह 80, कबीरने 3 चौकारांसह 41, शशांकने 11 धावा केल्या. एसकेईतर्फे निशींतने 30 धावांत 4 तर विराटने 2 गडी बाद केले. प्रत्युत्तरादाखल खेळताना एसकेईचा डाव 20 षटकात सर्वगडी बाद 77 धावात आटोपला. दक्ष शेरीगारने 3 चौकारांसह 39, आयुष एन.ने 13, साईराजने 10 धावा केल्या. आनंदतर्फे रोशनने 5 धावांत 4, श्रीतेजने 11 धावांत 3 व प्रणीतने 1 गडी बाद केला.