‘अष्टगंधा’च्या प्रकाश कांदोळकरला अटक
तब्बल 11 कोटींचे गैरव्यवहारप्रकरण : आर्थिक गुन्हे शाखेकडून कारवाई
तिसवाडी : अष्टगंधा अर्बन को-ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी लिमिटेडमधील तब्बल 11 कोटी ऊपयांच्या आर्थिक गैरव्यवहार प्रकरणी आर्थिक गुन्हे शाखेने (इपीएफ) प्रकाश कांदोळकर (70, पार्से, पेडणे) याला अटक केली आहे. आर्थिक गुन्हे शाखेकडून नोंद करण्यात आलेल्या गुन्हा क्रमांक 04/2024 अंतर्गत ही चौकशी सुरू असून, ठेवीदारांच्या कोट्यावधी ऊपयांच्या निधीचा अपहार आणि आर्थिक फसवणूक झाल्याचा आरोप आहे. या प्रकरणात 11 कोटी ऊपयांहून अधिक रकमेचा गैरव्यवहार झाल्याचे तपासात समोर आले आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, अष्टगंधा अर्बन को-ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटीमध्ये अनेक ठेवीदारांनी आपली बचत गुंतवली होती. मात्र नंतर सोसायटीतील आर्थिक व्यवहारांमध्ये मोठ्या प्रमाणावर अनियमितता असल्याच्या तक्रारी समोर आल्या. त्यानंतर आर्थिक गुन्हे शाखेने तपास सुरू केला होता.
पार्सेतील घरातून घेतले ताब्यात
आरोपी प्रकाश कांदोळकर याने अटकेपासून संरक्षण मिळविण्यासाठी न्यायालयात अटकपूर्व जामिनासाठी अर्ज दाखल केला होता. मात्र न्यायालयाने त्याचा अर्ज फेटाळून लावला. त्यानंतर आर्थिक गुन्हे शाखेच्या पथकाने त्याचा शोध घेऊन पार्से येथील राहत्या घरातून त्याला ताब्यात घेतले. अटकेनंतर आरोपीला न्यायालयात हजर करण्यात आले असता न्यायालयाने त्याला पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. या काळात आर्थिक व्यवहार, निधीचे हस्तांतरण, संबंधित कागदपत्रे तसेच इतर संशयित व्यक्तींबाबत सखोल चौकशी केली जाणार असल्याची माहिती पोलिसांनी दिली. या प्रकरणाचा तपास पोलीस उपनिरीक्षक परेश रामनाथकर करत असून, आर्थिक गुन्हे शाखेच्या अधीक्षक अर्शी आदिल आणि उपअधीक्षक फ्रान्सिस कोर्त यांच्या मार्गदर्शनाखाली तपास सुरू आहे.