आंबेडकरांनी 'वंचित आघाडी' बरखास्त करावी...त्यांचे आम्ही बारा वाजवणार- रामदास आठवले
आगामी लोकसभा निवडणुकीत भाजपाला ४०४ हून अधिक जागा मिळणारच असा दावा करून वंचित बहूजन आघाडीने रिपब्लिकन पार्टीमध्ये विलिनीकरण करावे असे आवाहन पक्षाचे राष्ट्रीय़ अध्यक्ष रामदास आठवले यांनी केलं आहे. तसेच प्रकाश आंबेडकरांचा काँग्रेसला दिलेल्या 12- 12 च्या फॉर्म्युलाचा आम्ही 12 वाजवू असेही त्यांनी वक्तव्य केलं आहे.
सांगलीच्या दौऱ्यावर असलेले केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी आज माध्यमांशी बोलत होते. ते म्हणाले, "आम्ही सुरुवातीपासून बाबासाहेब आंबेडकरांनी स्थापन केलेल्या रिपब्लिकन पक्षाच्या माध्यमातून काम करून पक्ष वाढवत आहोत. पण काही लोकांनी पक्षाचे नाव बदलून आपले राजकारण सुरू केले. बाबासाहेबांच्या विचारांचा पक्ष चालवायचा असेल तर सर्व जाती धर्मातील लोकांना एकत्र आणलं पाहिजे," असे आवाहन करत असताना त्यांनी प्रकाश आंबडेकारांना एक ऑफर दिली.
रामदास आठवले म्हणाले की, "प्रकाश आंबेडकरांनी वंचित बहुजन आघाडी बरखास्त करून डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या आरपीआय पक्षाचे अध्यक्षपद आपल्याकडे घ्यावं. आंबे़डकर महायुतीमध्ये येत असतील तर मी त्यांच्यासाठी पक्षाचे अध्यक्षपद आणि केंद्रीय मंत्रीपद सोडण्यासाठी तयार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची अनेक स्मारके पूर्ण केली आहेत. त्यामुळेच ते संविधान बदलतील, अशी चुकीच्या अफवा पसरवल्या आहेत." असे ते म्हणाले.
पुढे बोलताना त्यांनी महाविकास आघाडीमधील वंचितच्या जागावाटपाच्या फॉर्म्युलावर बोलताना ते म्हणाले, "प्रकाश आंबेडकरांचा 12- 12 चा फॉर्म्युला चांगला आहे. पण आम्ही महाविकास आघाडीच्या या फॉर्म्युलाचे 12 वाजवणार आहोत."असेही ते म्हणाले.