Prakash Abitkar : काळजी घ्या, घाबरु नका, कोरोनाबाबत आरोग्यमंत्र्यांचा महत्वाचा सल्ला
कोरोनाचे लक्षण सौम्य असून नागरिकांनी काळजी घेणे गरजेचे
कोल्हापूर : सध्या कोरोनाच्या रुग्णसंख्येत वाढ होत असल्याची माहिती समोर येत आहे. परंतु यावर आता खुद्द राज्याचे आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांनी जनतेला घाबरुन न जाता आरोग्याची काळजी घेण्याचे आवाहन केले आहे. आरोग्य विभाग सर्वच आजारांबाबतीत सतर्क आहे.
कोणत्याही आजाराची लक्षणं वाढत असतील तर आरोग्य विभाग लक्ष ठेवून असल्याची प्रतिक्रिया त्यांनी दिली. ते म्हणाले, कोरोना रुग्णांची संख्या देशभरात वाढत असल्याने नागरिकांकडून विचारणा होत आहे. परंतु आता आपली रोग प्रतिकारशक्ती आधीपेक्षा कित्येक पटीने वाढली असल्याने घाबरण्याचं कारण नाही, असं स्पष्ट केलं आहे.
आज कोल्हापुरात ते माध्यमांशी बोलत होते. यावेळी ते म्हणाले, कोरोनाचे लक्षण सौम्य असून नागरिकांनी काळजी घेणे गरजेचे आहे. तसेच विविध आजार असलेल्या नागरिकांनीही आपल्या आरोग्याची काळजी घ्यावी. राज्य शासनाच्या आरोग्य विभागाचा, केंद्राच्या आरोग्य विभागाशी सातत्याने संपर्क आहे.
केंद्राच्या आरोग्य विभागाने आताच्या कोरोनाबाबत सौम्य लक्षण असल्याचं सांगितलंय. त्यामुळे नागरिक पॅनिक होतील अशी माहिती न देण्याच्या सूचना केंद्राने दिल्या आहेत. त्यामुळे नागरिकांनी घाबरून न जाता केवळ आरोग्याची काळजी घ्यावी, असे आवाहन आरोग्यमंत्र्यांनी केले आहे.
पुढे ते म्हणाले, कोरोनाची आकडेवारी लपवण्याची गरज नाही, मात्र वस्तुस्थिती लोकांना सांगणे गरजेचे आहे. तज्ज्ञ डॉक्टरांनी सांगितलं आहे की, आता कोरोना सर्दी, ताप, खोकल्याप्रमाणे आपल्या सोबत राहील. स्वाइन फ्लूसारखी सुद्धा लक्षण आत्ताच्या कोरोनामध्ये नाहीत. कोणत्याही आजाराचे पेशंट वाढले तर डॉक्टरांना सूचना दिल्या जातात, असंही त्यांनी नमूद केलं आहे.
जळगाव जिल्ह्यातील प्रसूतीसंदर्भात विचारले असता आबिटकर म्हणाले, जळगावमध्ये घडलेली घटना खेदजनक आहे. यामध्ये आरोग्यविभागाकडून काही दिरंगाई झाली असेल तर त्याची चौकशी होईल. शहरातच नव्हे तर खेडोपाड्यात, वाड्या वस्त्यांवर सर्वसामान्यांच्या दारात आरोग्य यंत्रणा पोहोचवण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. समाज माध्यमांवर प्रसिद्ध होणारा व्हिडिओ डॉक्टरचा व्हिडिओ मी पाहिलेला नाही. त्यामुळे तो व्हिडीओ पाहिल्यानंतरच त्यावर प्रतिक्रिया देणं उचित ठरेल.