प्रज्ज्वल शुक्रवारी एसआयटीसमोर
परदेशातून व्हिडिओद्वारे दिली माहिती : हासनमध्ये आपल्याविरुद्ध कट रचल्याचा आरोप
बेंगळूर : लैंगिक अत्याचाराच्या आरोपांचा सामना करत असलेले खासदार प्रज्ज्वल रेवण्णा यांनी 31 मे रोजी एसआयटीसमोर हजर होणार असल्याचे म्हटले आहे. सोमवारी परदेशातून व्हिडिओ जारी करत प्रज्ज्वल यांनी इतके दिवस परदेशात कुठे होतो याची माहिती न दिल्याबद्दल माफी मागितली आहे. 26 एप्रिलला निवडणूक झाली तेव्हा माझ्यावर एकही प्रकरण नव्हते. एसआयटीचीही स्थापना झाली नव्हती. 26 तारखेला परदेशात जायचे माझे यापूर्वीच ठरले होते. म्हणून मी गेलो. 2-3 दिवसांनंतर जेव्हा मी बातम्या माध्यमात पाहिले तेव्हा मला याची माहिती मिळाली आणि एसआयटीने नोटीस देखील जारी केली, असे व्हिडिओत म्हटले आहे. एसआयटीच्या नोटिसीलाही आपण सात दिवसांचा कालावधी देण्याची विनंती मी माझ्या ‘एक्स’ खात्याद्वारे आणि माझ्या वकिलामार्फत केली होती. मी वेळ मागितल्याच्या दुसऱ्या दिवसापासून राहुल गांधी यांच्यासह काँग्रेसच्या काही नेत्यांनी या मुद्याचा प्रचारासाठी उपयोग केला. राजकीय षड्यंत्र रचण्याचे काम केले. हे सर्व पाहून मला नैराश्य आले आणि कोणाशीही माझा संपर्क झाला नाही. त्यामुळे मी सर्वांची माफी मागतो, असे प्रज्ज्वल रेवण्णा यांनी जारी केलेल्या व्हिडिओमध्ये स्पष्ट केले आहे.
तपासाला सहकार्य करणार!
याचबरोबर हासनमध्येही काही शक्ती एकत्र आल्या आणि त्यांनी माझ्याविऊद्ध कट रचला. या प्रकरणातही सर्वांनी मिळून माझी राजकीय बदनामी केली. हे सर्व बघून मला धक्काच बसल्याने मी काही दिवस दूर राहिलो. कोणीही चुकीचे समजून घेऊ नये. 31 मे रोजी मी स्वत: एसआयटीसमोर हजर राहून तपासाला पूर्ण सहकार्य देईन, असे प्रज्ज्वल यांनी सांगितले आहे. माझा न्यायालयावर पूर्णपणे विश्वास आहे. या खोट्या प्रकरणातून मी न्यायालयाच्या माध्यमातून बाहेर पडण्याचा प्रयत्न करणार आहे. देवाचे, लोकांचे आणि माझ्या कुटुंबाचे आशीर्वाद माझ्यावर असू दे. एसआयटीच्या तपासात उपस्थित राहून सर्वकाही स्पष्ट करणार आहे, असे प्रज्ज्वल रेवण्णा यांनी त्यांच्या व्हिडिओद्वारे स्पष्ट केले आहे.
कायदेशीर लढ्याची तयारी अन् माफीनामा...
अज्ञात ठिकाणाहून 2 मिनिट 57 सेकंदाचा व्हिडिओ तयार करण्यात आला असून हा व्हिडिओ कोठून बनवला गेला आणि जारी केला गेला हे समजू शकलेले नाही. तरीही त्यांच्या व्हिडिओमध्ये त्यांच्या कुटुंबाविरोधात राजकीय षड्यंत्र रचले जात आहे. मी कायद्याने लढा देईन. मी काहीही चुकीचे केले नसल्याचे त्यांनी सांगितले. त्याने आपले वडील, आई, आजोबा आणि कुमारस्वामी यांची माफी मागितली आहे. तसेच त्यांनी पक्षाच्या कार्यकर्त्यांसह राज्यातील जनतेचीही माफी मागितली आहे.