प्रज्वल देव अंतिम फेरीत
डेहराडून : येथे सुरू असलेल्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत टेनिसपटू प्रज्वल देवने पुरुष एकेरीतील उपांत्य सामना जिंकून अंतिम फेरीत प्रवेश मिळविला. देवच्या या कामगिरीमुळे कर्नाटकाला आणखी एक सुवर्णपदक मिळविण्याची संधी निर्माण झाली आहे. प्रज्वल देवने आपले एकेरीचे आणि दुहेरीचे सामने जिंकून कर्नाटकाला अंतिम फेरीत नेले आहे. कर्नाटक विद्यमान विजेता आहे. आता सुवर्णपदकासाठी कर्नाटक आणि तामिळनाडू यांच्यात शुक्रवारी सामना होणार आहे. तामिळनाडूने उपांत्य फेरीच्या सामन्यात महाराष्ट्राचा 2-1 असा पराभव केला.
सेनादल आणि कर्नाटक यांच्यातील उपांत्य लढतीत सेनादलाच्या ऋषभ अगरवालने कर्नाटकाच्या निकी पुनाच्याचा 6-4, 1-6, 6-1 असा पराभव केला. त्यानंतर दुसऱ्या एकेरीत सामन्यात कर्नाटकाच्या प्रज्वल देवने सेनादलाच्या इक्बालचा 6-2, 3-6, 6-3 असा पराभव केला. त्यानंतर दुहेरीच्या सामन्यात प्रज्वल आणि निकी यांनी सेनादलाच्या अगरवाल व फैजल कमार यांचा 6-3, 6-4 अशा फडशा पाडत अंतिम फेरीत प्रवेश मिळविला. महिलांच्या विभागात कर्नाटकाचे आव्हान उपांत्यपूर्व फेरीतच समाप्त झाले. तामिळनाडूने कर्नाटकावर 2-1 अशी मात करत उपांत्यफेरी गाठली.