For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

प्रज्ञासूर्य कौटिल्य आणि संरक्षण सिद्धांताची प्रखरता

06:21 AM May 20, 2025 IST | Tarun Bharat Portal
प्रज्ञासूर्य कौटिल्य आणि संरक्षण सिद्धांताची प्रखरता
Advertisement

प्राचीन भारतामध्ये राजनीती आणि परराष्ट्र धोरण प्रगल्भपणे विकसित झाले होते. जागृत व दक्ष परराष्ट्र धोरण या प्रज्ञासूर्य कौटिल्याच्या या आंतरदृष्टीचा उपयोग वर्तमान काळातसुद्धा होत आहे. आचार्य कौटिल्यांनी अर्थशास्त्रात मांडलेले राज्यमंडल आणि सप्तांग हे दोन सिद्धांत आजही महत्त्वाचे ठरतात. मोदी यांचा संरक्षण सिद्धांत याच प्रमेयावर आधारलेला आहे. त्यामुळे दहशतवादाचे समूळ उच्चाटन शक्य होईल.

Advertisement

प्रज्ञासूर्य कौटिल्य ऊर्फ आर्य चाणक्य हे तक्षशिला विद्यापीठात राजकीय अर्थशास्त्राचे प्राध्यापक होते. त्यांचा जीवनकाळ कार्यकाळ इ.स. पूर्व 370 ते 283 असा होता. त्यांनी अर्थशास्त्र हा ग्रंथ इ.स. पूर्व 322 ते 298 या काळात लिहिला असे मानले जाते. त्यांनी एकाचवेळी चंद्रगुप्त, बिंदूसार आणि अशोक या तीनही मौर्य सम्राटांना राजनीतिशास्त्राचे मार्गदर्शन केले. अर्थशास्त्रात 17 अध्याय आणि 333 श्लोक आहेत. धर्म आणि राजकारणाची परस्पर संबद्धता जगात प्रथम कौटिल्याने मांडली. त्यांच्या मते, कुठल्याही राष्ट्राचे परराष्ट्र धोरण हे स्वहितावर लक्ष केंद्रित करणारे असते. स्वत:च्या सुरक्षिततेसाठी आक्रमण करणे, प्रतिस्पर्ध्यापासून प्रजेचे रक्षण करणे हे बलशाली राज्याचे कर्तव्य असते. ऑपरेशन सिंदूरच्यारुपाने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कौटिल्याचा हा सिद्धांत प्रत्यक्षात कृतीमध्ये आणला आहे. त्यांनी काँग्रेस राजवटीतील साचेबद्ध पारंपरिक भारतीय राजकारणाची समीकरणे संपूर्णपणे बदलून टाकली आहेत. त्यांचे प्रत्येक भाषण हे प्रखर हिंदुत्वावर आधारलेल्या नव्या सिद्धांताचे नवे समीकरण असते. त्यांचे विकास विषयक सिद्धांत जसे मुलभूत विचार करणारे आहेत तसेच त्यांनी बुद्ध पौर्णिमेच्या दिवशी देशाला उद्देशून केलेल्या संभाषणात सुद्धा या सिद्धांताची योजकतेने आणि सुस्पष्टपणे मांडणी केलेली आहे. हिंदुत्व हेच राष्ट्रीयत्व हे डॉ. हेडगेवारांचे सूत्र घेऊन त्या आधारे नवभारताची उभारणी करण्यासाठी अंतर्गत आणि बाह्य धोरणाची संपूर्णपणे नवी फेरमांडणी करण्याचा हा संकल्प त्यांनी पंतप्रधानपदाची सूत्रे घेण्यापूर्वी गुजरातमधील लालन कॉलेजच्या व्यासपीठावरून प्रचार मोहिमेचा प्रारंभ करताना केली होती. गेल्या 10 वर्षातील त्यांचे धवलयश या सिद्धांताची प्रचिती आणून देणारे आहे. त्यांनी विकसित केलेल्या संरक्षण सिद्धांताची मांडणीसुद्धा अशा प्रखर हिंदुत्वाच्या सिद्धांतावर आधारलेली आहे आणि हा सिद्धांत गेल्या 5000 वर्षातील भारताच्या सांस्कृतिक राष्ट्रवादाचा परिपाक आहे. तुमचा शेजारी तुमचा नैसर्गिक शत्रू आहे आणि शेजाऱ्याचा शेजारी तुमचा मित्र आहे. हा कौटिल्याच्या मंडल सिद्धांताचा आत्मा होय. त्यानुसार, पाकिस्तानशी लढताना भारताने अफगाणिस्तानशी मैत्री करणे यथायोग्य आहे. तसेच बलुचिस्तानला सहाय्य करणे हे सुद्धा आपले कर्तव्य आहे. मित्राचा मित्र जो प्रादेशिकदृष्टीने दूर आहे तो विजिगीषु मित्र हा रशियासारखा एक विश्वासू आणि समर्थक पाठीराखा आहे. शोभित मिश्रा यांनी मंडल सिद्धांताचे अचूक आणि साक्षेपी विश्लेषण केले आहे. (आर.जे.एच.एच.एस., खंड 3, अंक 1, पृ. 145-148). ऑपरेशन सिंदूर हे केवळ मोहिमेचे नाव नाही तर देशातील लाखो लोकांच्या भावनांचे प्रतिक आहे. हे त्यांनी मांडलेले प्रमेय या प्रखर हिंदुत्वाच्या सिद्धांताचे प्रकटीकरण करते. न्याय प्राप्तीची ही अढळ वचनबद्धता भारताच्या सांस्कृतिक इतिहासातून विकसित झाली आहे. 7 मे रोजी ही वचनबद्धता प्रत्यक्षात प्रकट होताना जगाने पाहिली. याचा अर्थ असा की, त्यांच्या नव्या संरक्षण सिद्धांताची प्रत्यक्ष प्रचिती आली आहे. जेव्हा देश भक्कम, एकजूट भावनेने कार्य करतो, राष्ट्र प्रथम हा मंत्र जेव्हा चैतन्यदायी आविष्कार घेऊन प्रकट होतो तेव्हाच अशा प्रकारची समर्थ कृती होऊ शकते.

राज्यमंडलाचे प्रतिबिंब?

Advertisement

कौटिल्याच्या विचारांचे प्रतिबिंब भारतीय विद्वानांच्या ग्रंथसंपदेत उमटले आहे. के.पी. जयस्वाल यांनी ‘हिंदू पॉलिटी’ या ग्रंथात असे म्हटले आहे की, हिंदू राजनीति ही पूर्णपणे विकसित व्यवस्था होती. या व्यवस्थेमध्ये जनपदांचा कारभार लोकशाही पद्धतीने चालत असे. तसेच राज्यकर्त्याला सल्ला देण्यासाठी सभा व समितीसारख्या संस्था होत्या आणि लोकशाहीतील संस्थात्मक जीवनाचा परिपूर्ण विकास हे या व्यवस्थेचे वैशिष्ट्या होते. शिवाय समृद्ध, संपन्न अशा भूभागाला भक्कम अशी संरक्षण व्यवस्थेची जोडही देण्यात आली होती. बनारस हिंदू विद्यापीठातील प्रा. डॉ. अनंत सदाशिव आळतेकर यांनी स्टेट अॅन्ड गव्हर्मेंट इन एन्शंट इंडिया हा ग्रंथ लिहून त्यामध्ये प्राचीन भारतातील सुदृढ राज्यव्यवस्था आणि प्रशासनावर सखोल प्रकाश टाकला. त्यांच्या मते, प्राचीन भारतातील कल्याणकारी राज्यात प्रजेचे हित अत्यंत महत्त्वाचे होते व राज्यसंस्था आपल्या प्रजेचे शत्रूपासून रक्षण करण्यात अग्रभागी होती. तसेच राजधर्माचे पालन करण्यात राज्यकर्ते सदैव आघाडीवर असत. त्यानुसार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राजधर्माचे पालन करून पहलगामला प्रत्युत्तर देण्यासाठी घेतलेला मोठा धाडसी निर्णय हा इतिहासदत्त आहे. आपल्या सांस्कृतिक अनुभवांच्या प्रचितीवर आधारलेला आहे. बहावलपूर आणि मुरीदके ही दहशतवादी विद्यापीठे बनली होती. त्यांच्यावर अचूक प्रहार करून भारताने नालंदा विद्यापीठ बख्तियार खिलजीने इ.स. 1193 मध्ये जाळले होते. त्याच्या या दहशतवादी कृत्याचा बदला भारताने घेतला आहे. प्राचीन आणि मध्ययुगीन काळात भारताच्या सांस्कृतिक मानबिंदूवर हल्ला करण्याच्या रानटी मनोवृत्तीचे वस्त्रहरण झाले आहे. जगामध्ये वर्ल्ड ट्रेड सेंटरवर झालेला 9/11 चा हल्ला असो, लंडन येथील ट्यूब बॉम्बस्फोट असो, 1999 पासून पहलगामपर्यंत भारतावर झालेले दहशतवादी हल्ले असो, या सर्वांचा बदला नरेंद्र मोदी यांच्या ऑपरेशन सिंदूरने घेतला आहे. हा बदला म्हणजे कौटिल्यांच्या राजमंडल सिद्धांताचा प्रत्यय आहे. या सिद्धांतामध्ये संधी (करार किंवा युद्धबंदी), विग्रह (युद्ध घोषणा), आसन (अलिप्तता), यान (मोहीम), समश्रेय (युती किंवा आघाडी) आणि दैद्वीभव (दुहेरी चाल) हे सहा प्रमुख घटक आहेत. कुशल राज्यकर्ता हा केव्हा संधी करावी, पुन्हा युद्धाचे रणशिंग केव्हा फुंकावे, अलिप्तता किंवा तटस्थता केव्हा स्वीकारावी, पुन:श्च जोरदार मुसंडी कशी मारावी, आगेकूच केव्हा करावी, तसेच मित्र पक्षाशी युती किंवा आघाडी केव्हा करावी आणि शत्रूला संभ्रमात टाकणारी दुहेरी चाल कशी खेळावी या गनिमी काव्याबद्दल कौटिल्याने मौलिक विश्लेषण केले आहे व पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीसुद्धा मुत्सद्दी राज्यकर्ता या नात्याने राजधर्म पाळताना या राजमंडल सिद्धांताचा साक्षेपी प्रयोग केला आहे. या सिद्धांताप्रमाणे, जागतिक लोकशाहीला धोका असलेल्या दहशतवादाचे समूळ उच्चाटन करण्याची ही भूमिका लक्षात घेता जगातील सर्व लोकशाही राष्ट्रांनी भारताचे समर्थन केले पाहिजे, ही गोष्ट अधोरेखित करावी लागेल. दहशतवादाचे राहू केतू लोकशाहीच्या सूर्याला गिळंकृत करू शकत नाहीत ही काळ्या दगडावरची रेघ आहे. त्यामुळे दहशतवादाविरुद्ध महायुती करून हे खग्रास ग्रहण लागण्यापूर्वी सोडविले पाहिजे. गेल्या दोन दशकात जगामध्ये झालेल्या प्रमुख दहशतवादी हल्ल्याची पाळेमुळे नापाक मनोवृत्तीच्या दुष्ट राजकारणाशी जोडलेली आहेत. हे लक्षात घेऊन ही धाडसी मोहिम ‘याना’प्रमाणे हाती घेण्यात आली. भारताने 21 दहशतवादी केंद्रे लक्ष्य केली त्यापैकी 9 केंद्रांचा खातमा करण्यात आला. भारताने चुकूनही पाक जनता व नागरी केंद्रावर हल्ले केले नाहीत याउलट पाकने मात्र गुरुद्वारा, मंदिरे आणि महाविद्यालयांवर तसेच नागरीकांच्या निवासस्थानावरही हल्ले केले. यातून उभयतांच्या क्रिया प्रक्रियातील नैतिक अंतर स्पष्ट होते. पाकच्या अधिकाऱ्यांनी भारताच्या डीजीएमओशी संपर्क करून युद्धबंदीची म्हणजे संधीची विनवणी केली. यापुढे दहशतवादाच्या समर्थनाचे धाडस केले जाणार नाही असे अभिवचन दिल्यानंतरच युद्धबंदी झाली आहे. ऑपरेशन सिंदूरने दहशतवादाविरुद्धच्या कारवाईमध्ये एक नवा बेंचमार्क, नवा मानदंड आणि एक नवा सामान्यत: बिंदू प्रस्थापित केला आहे. कौटिल्याच्या राजमंडल सिद्धांताचा विस्तार अत्यंत योजकतेने करून पंतप्रधानांनी नवा संरक्षण सिद्धांत प्रखरतेने मांडला आहे.

मोदी सिद्धांताचे तीन पैलू?

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या भाषणात मांडलेल्या संरक्षण सिद्धांताचे तीन पैलू लक्षणीय आहेत. त्यापैकी पहिला पैलू हा आहे की, भारतावर जर दहशतवादी हल्ला झाला तर जेथून हा हल्ला झाला आहे त्याचे मूळ शोधून भारत त्यावर अचूक प्रहार करेल. 7 मे हे भारतीय इतिहासातील 7 वे सोनेरी पान आहे. हा एक नवा आयाम आहे आणि यापुढे भारताविरुद्ध दहशतवादी कृत्ये करण्याचे धाडस कोणी केले तर भारत त्याला चोख प्रत्युत्तर देईल म्हणजे आपल्या प्रगत तंत्रज्ञानाने आणि अद्ययावत साधन सामुग्रीमुळे भारत दहशतवादाच्या कोणत्याही कृत्याला हाणून पाडेल. हा सावरकर सिद्धांताचा विजय होय. नीति, नियत आणि निर्णयक्षमता याचा निश्चित प्रत्यय भारताच्या सिंदूर मोहिमेतून प्रकटला आहे. त्यामागे विज्ञान तंत्रज्ञानातील भारताची प्रगती आणि उच्चतम गुणवत्ता ही तपश्चर्या आहे. मेक इन इंडियामधील भारताने साध्य केलेल्या स्वदेशी क्षेपणास्त्रांचा हा आत्मविश्वास आहे.

या सिद्धांताचा दुसरा पैलू असा की, अणुयुद्धाचा बागुलबुवा उभा करून ब्लॅकमेल करणे भारत यापुढे सहन करणार नाही. या अणुयुद्धाच्या आडून दहशतवाद पोसण्याचा प्रयत्न केल्यास भारत त्या स्थळांचा शोध करून त्यावर नेमका हल्ला करेल असेही त्यांनी सूचित केले आहे. सिद्धांताचा तिसरा पैलूही तेवढाच महत्त्वाचा आहे. त्यामध्ये त्यांनी असे नमूद केले की, दहशतवाद पोसणारे सरकार आणि दहशतवादाचे म्होरके यांच्यात आम्ही फरक करणार नाही. पाकिस्तानचा पुरस्कृत दहशतवाद हा भारतालाच नव्हे तर संपूर्ण जगाला धोकादायक आहे हे लक्षात घेऊन मोदी यांनी पाकला हे ठणकावून सांगितले की, दहशतवादाचे समूळ उच्चाटन करण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत. दहशतवादाविरुद्ध शून्य सहनशीलता हा या तीनही पैलूंचा प्रधान आधार आहे. सध्याची युद्धबंदी तात्पुरती आहे. ऑपरेशन सिंदूर संपलेले नाही.  पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी असे सूत्र मांडले की, दहशतवाद हा जणू भस्मासूर आहे. पाकिस्तानने दहशतवाद पोसला तर एक दिवस तेथील राज्यकर्ते व सरकारलाही हा भस्मासूर गिळंकृत करेल. पाकिस्तानला दहशतवाद पोसणे थांबवावे लागेल.

अमेरिकेलाही इशारा?

जगातील सर्व लोकशाही राष्ट्रे आणि 250 वर्षांची परंपरा लाभलेल्या अमेरिकेसह सर्व जागतिक समुदायाला मोदी यांनी संबेधित केले. चर्चा होऊ शकते ती दहशतवादाच्या उच्चाटनाबाबत तसेच पाकव्याप्त काश्मीरबाबत. ही ठाम भूमिका ट्रम्प यांना हादरा देणारी आहे. त्यामुळे ट्रम्प यांनी भारताची भूमिका मान्य करून उभय राष्ट्रांनी परस्पर चर्चेतून शांतता प्रस्थापनेचा मार्ग शोधावा असे सूचित केले. खरेतर, अमेरिकेने काश्मीरबाबत अकारण लुडबुड करू नये. काश्मीर तर भारताचा अविभाज्य घटक आहे व राहील. पाकिस्तानने अवाजवी व अयोग्य मार्गानी ताब्यात ठेवलेला पाकव्याप्त काश्मीरचा प्रदेश भारताला सुपूर्द करणे हेच शहाणपणाचे आहे, असा मोदी यांच्या निवेदनाचा अर्थ आहे. तसेच जगातील सर्व लोकशाही राष्ट्रांनी दुटप्पी भूमिका घेता कामा नये. दहशतवादाविरुद्धच्या लढाईत भारताची सातत्यपूर्ण भूमिका ही नव्या अभियानाची उक्रांती आहे. कौटिल्याच्या राजमंडलाची प्रचिती आहे. ट्रम्प यांनी या संकेताचा अर्थ लक्षात घेऊन एक पाऊल मागे टाकले आहे. दोन्ही देशांनी चर्चेने प्रश्न सोडवावा असे मान्य केले आहे. आम्ही अमेरिकेच्या किंवा अन्य कोणत्याही देशाच्या मध्यस्थीला मानीत नाही असे पंतप्रधानांनी सूचित केले आहे. तसेच दहशतवाद आणि व्यापार या गोष्टी एकत्र घडू शकत नाहीत. हे ठणकावून सांगताना त्यांना असेही म्हणावयाचे आहे की, दहशतवादी राष्ट्राशी कुठल्याही लोकशाही देशाने व्यापार करता कामा नये किंवा त्यांचे आर्थिक समर्थन करता कामा नये. त्यांच्या चिंतनातील ही स्पष्टता प्राचीन भारतीय तत्त्वज्ञानाच्या अभ्यासातून आली आहे. कारण कौटिल्याने सुद्धा समान शत्रू विरुद्ध प्रभावी युती करण्याचे तत्वसूत्र सांगितले आहे.

प्रा. डॉ. वि. ल. धारूरकर

Advertisement
Tags :

.