For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

अटकपूर्व जामिनासाठी प्रज्ज्वल रेवण्णांची याचिका

12:16 PM May 30, 2024 IST | Tarun Bharat Portal
अटकपूर्व जामिनासाठी प्रज्ज्वल रेवण्णांची याचिका
Advertisement

तातडीने सुनावणीस न्यायालयाचा नकार : आता शुक्रवारी निर्णय

Advertisement

बेंगळूर : अश्लील चित्रफिती आणि लैंगिक शोषण प्रकरणात अटकेची भीती असल्याने हासनचे खासदार प्रज्ज्वल रेवण्णा यांनी अटकपूर्व जामीन याचिका दाखल केली आहे. सीआयडी पोलीस स्थानक, होळेनरसीपूर पोलीस स्थानक आणि सायबर क्राईम स्टेशनमध्ये दाखल असणाऱ्या तीन प्रकरणांमध्ये अटकपूर्व जामीन मिळविण्यासाठी त्यांनी वकिलामार्फत याचिका दाखल केली आहे. बेंगळूरच्या लोकप्रतिनिधींच्या विशेष न्यायालयात ही याचिका दाखल करण्यात आली आहे. मात्र, या याचिकेवर तातडीने सुनावणी करण्यास न्यायालयाने नकार दिला आहे. तीन प्रकरणांमध्ये आक्षेप दाखल करण्यास एसआयटीला वेळ द्यावा लागेल. त्यामुळे प्रज्ज्वलच्या याचिकेवर तातडीने सुनावणी शक्य नाही, असे सांगून सुनावणी 31 मेपर्यंत पुढे ढकलली आहे.

अधिकारी विमानतळावर ठाण मांडून

Advertisement

मागील महिन्यात विदेशात पळ काढल्यानंतर प्रज्ज्वल रेवण्णा यांनी सोमवारी दुसरा व्हिडिओ जारी केला. त्यात 31 मे रोजी सकाळी 10:30 वाजता एसआयटीसमोर हजर होणार असल्याचे सांगितले होते. दरम्यान, प्रज्ज्वलने जर्मनीतून भारतात परतण्यासाठी लुफ्तान्सा विमानाचे तिकीट बुकींग केले आहे. ते 30 मे रोजी मध्यरात्री बेंगळूर विमानतळावर पोहोचण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. त्यामुळे बेंगळूरमधूनच त्यांना ताब्यात घेण्यासाठी एसआयटीचे अधिकारी केंपेगौडा आंतरराष्ट्रीय विमानतळावर ठाण मांडून आहेत. प्रज्ज्वल यांच्याविरुद्ध अटक वॉरंटही जारी करण्यात आले आहे. त्यांनी 31 मे रोजी एसआयटीपुढे हजर होणार असल्याचे सांगितले असले तरी देशात फरार होण्याची भीती एसआयटीला सतावत आहे. त्यामुळे प्रज्ज्वल विमानतळावर उतरताच त्यांना अटक ताब्यात घेतले जाणार आहे. यापूर्वी तीन वेळा विमानाचे तिकीट बुकींग केलेल्या प्रज्ज्वल यांनी अखेरच्या क्षणी ही तिकिटे रद्द केली. त्यामुळे यावेळी एसआयटीच्या पथकाने खबरदारी बाळगली आहे.

‘तो’ व्हिडिओ हंगेरीतील बुडापेस्टमधून जारी...

सोमवार 27 मे रोजी प्रज्ज्वल रेवण्णा यांनी भारतात परतण्यासंबंधी व्हिडिओ जारी केला होता. हा व्हिडिओ कोठून जारी केला, याविषयी एसआयटीला महत्त्वपूर्ण माहिती उपलब्ध झाली आहे. हंगेरीमधील बुडापेस्ट या शहरातून प्रज्ज्वल यांनी मोबाईलवरून व्हिडिओ जारी केला आहे. सदर मोबाईलची माहिती एसआयटीने मिळविली आहे. तो व्हिडिओ दोन दिवस आधीच तयार करण्यात आला होता. विदेशात पळ काढून एक महिना पूर्ण झालेल्या दिवशीच प्रज्ज्वलने हा व्हिडिओ जारी केला आहे. ते सुरुवातीला जर्मनीमध्ये असल्याचे सांगण्यात आले होते. नंतर रेल्वेने लंडनला गेल्याचे सांगण्यात आले होते. तर, काहींनी ते दुबईत असल्याचे सांगितले होते.

Advertisement
Tags :

.