प्रज्ज्वल रेवण्णाची पुन्हा निराशा
अत्याचार प्रकरण : सर्वोच्च न्यायालयाने फेटाळली जामीन याचिका
प्रतिनिधी/ बेंगळूर
अत्याचार आणि अश्लील चित्रफिती प्रकरणी कारावासात असलेल्या माजी खासदार प्रज्ज्वल रेवण्णा याला पुन्हा एकदा धक्का बसला आहे. त्याला जामीन मंजूर करण्यास सर्वोच्च न्यायालयाने नकार दिला असून याचिका फेटाळण्यात आली आहे. त्यामुळे त्याला कारावासातच राहावे लागणार आहे. अत्याचार प्रकरणी उच्च न्यायालयाने जामीन याचिका फेटाळल्याने प्रज्ज्वल रेवण्णाने सर्वोच्च न्यायालयात अपील केले होते. त्याच्या याचिकेवर सोमवारी न्यायमूर्ती बेला एम. त्रिवेदी आणि न्या. सतीशचंद्र शर्मा यांच्या पीठासमोर सुनावणी झाली. वाद-युक्तिवाद झाल्यानंतर पीठाने उच्च न्यायालयाचा आदेश उचलून धरला तसेच प्रज्ज्वलने दाखल केलेली जामीन याचिका फेटाळून लावली.
प्रज्ज्वलच्या वतीने ज्येष्ठ वकील मुकुल रोहतगी यांनी, आरोपीने लोकसभा निवडणूक लढविली आहे. त्याच्या वर्चस्वाला धक्का पोहोचविण्याच्या उद्देशाने अत्याचाराचा आरोप करण्यात आला आहे. त्याला जामीन मंजूर करावा, अशी विनंती केली. मात्र, प्रज्ज्वल प्रभावी व्यक्ती असल्याने त्याची जामीन याचिका फेटाळण्यात आल्याचे सर्वोच्च न्यायालयाने स्पष्ट केले. तसेच सहा महिन्यानंतर पुन्हा जामीन याचिका दाखल करता येऊ शकते का, या प्रज्ज्वलच्या वकिलांनी विचारलेल्या प्रश्नावर न्यायाधीशांनी काहीही सांगणार नाही, असे स्पष्ट केले. त्यामुळे सर्वोच्च न्यायालयात जामीन मिळण्याची अपेक्षा असलेल्या प्रज्ज्वल रेवण्णाची निराशा झाली आहे. लोकसभा निवडणुकीला काही दिवस शिल्लक असताना प्रज्ज्वल रेवण्णा याची रासलिलेच्या चित्रफिती असणारे पेन ड्राईव्ह सर्वत्र पसरले होते. या प्रकरणानंतर त्याच्याविरोधात एका महिलेने अत्याचाराचा आरोप केला. व्हिडिओ व्हायरल होताच प्रज्ज्वलने जर्मनीत पळ काढला. काही आठवड्यानंतर बेंगळूरला परतल्यानंतर त्याला विमानतळावर पोलिसांनी अटक केली होती.