प्रज्ज्वल रेवण्णा यांना आणखी एका प्रकरणात जामीन नाकारला
प्रतिनिधी/ बेंगळूर
अत्याचार आणि अश्लील चित्रफिती प्रकरणी कारागृहात असलेल्या माजी खासदार प्रज्ज्वल रेवण्णा यांना पुन्हा धक्का बसला आहे. तीन प्रकरणांमध्ये जामीन मंजूर करण्यासाठी प्रज्ज्वल यांनी बेंगळूरच्या लोकप्रतिनिधी न्यायालयात याचिका दाखल केली होती. यापैकी एका प्रकरणात त्यांना जामीन नाकारण्यात आला आहे. न्यायमूर्ती संतोष गजानन भट यांनी हा आदेश दिला. दरम्यान, त्यांना अत्याचार प्रकरणातील पुरावे असणारे व्हिडिओ पाहण्याची परवानगी दिली आहे. 23 एप्रिलपासून साक्ष सादर करण्यात येणार असल्याने एसआयटीने जमा केलेले डिजिटल पुरावे पाहण्याची मुभा न्यायालयाने दिले आहे. यासंबंधी प्रज्ज्वल यांच्या वकिलांनी न्यायालयाकडे विनंती केली होती. प्रज्ज्वल यांचे दोन वकील, एसपीपी किंवा साहाय्यक, प्रज्ज्वल यांच्यावतीने त्यांचे आयटी तज्ञ, तपास अधिकारी आणि साहाय्यकांनी व्हिडिओ पाहण्यासाठी हजर राहावे, असे न्यायालयाने म्हटले आहे.