For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

अत्याचार प्रकरणात प्रज्ज्वल रेवण्णा दोषी

06:20 AM Aug 02, 2025 IST | Tarun Bharat Portal
अत्याचार प्रकरणात प्रज्ज्वल रेवण्णा दोषी
Advertisement

लोकप्रतिनिधी विशेष न्यायालयाचा निकाल : आज शिक्षा सुनावणार

Advertisement

प्रतिनिधी/ बेंगळूर

अत्याचार प्रकरणात लोकप्रतिनिधींच्या विशेष न्यायालयाने माजी खासदार प्रज्ज्वल रेवण्णा यांना दोषी ठरवले आहे. तसेच आज (शनिवारी) शिक्षा सुनावली जाणार आहे. बेंगळूरच्या के. आर. नगर येथील आपल्या घरात काम करणाऱ्या महिलेवर अत्याचार केल्याचा आरोप प्रज्ज्वल रेवण्णा यांच्यावर होता. या प्रकरणात गुन्हा दाखल करून चौकशी करण्यात आली होती. चौकशीनंतर पोलिसांनी न्यायालयात आरोपपत्र दाखल केले होते. आता या प्रकरणात ते दोषी ठरले असून त्यांना कोणती शिक्षा सुनावली जाणार याकडे राजकीय नेत्यांचे लक्ष लागले आहे.

Advertisement

लोकप्रतिनिधींच्या विशेष न्यायालयाचे न्यायमूर्ती गजानन भट यांनी शुक्रवारी प्रज्ज्वल रेवण्णा यांना दोषी ठरवले असून शनिवारी शिक्षा जाहीर करणार असल्याचे सांगितले. न्यायालयाने निकाल जाहीर होत असताना प्रज्ज्वल रेवण्णा न्यायालयात उपस्थित होते. या प्रकरणाची सुनावणी 30 जुलै रोजी पूर्ण झाली होती. मात्र, न्यायाधीशांनी निकाल राखून ठेवला होता. प्रज्ज्वल हे माजी मंत्री एच. डी. रेवण्णा यांचे पुत्र तर निजद सर्वेसर्वा माजी पंतप्रधान एच. डी. देवेगौडा यांचे नातू आहेत. या प्रकरणात सरकारतर्फे अॅड. एन. जगदीश व अॅड. अशोक नायक तसेच प्रज्ज्वल रेवण्णा यांच्यावतीने अऊण जी. यांनी युक्तिवाद केला. प्रज्ज्वल हे 14 महिन्यांपासून तुऊंगात असून या निकालाचा त्यांच्या राजकीय भविष्यावरही परिणाम करणारा ठरेल, असे म्हटले जात आहे.

प्रज्ज्वलविरुद्ध अत्याचारप्रकरणी तीन गुन्हे दाखल आहेत. घरकाम करणाऱ्या महिलेने दोन तक्रारी दाखल केल्या होत्या. तसेच जिल्हा पंचायतीच्या माजी सदस्या आणि मुलाला शाळेत प्रवेश देण्यास मदत करण्याचे सांगून आणखी एका महिलेवर अत्याचार केल्याच्या आरोप प्रकरणी गुन्हे नोंद आहेत. यातील एका प्रकरणात लोकप्रतिनिधी विशेष न्यायालयाने प्रज्ज्वलना दोषी ठरविले आहे.

प्रकरण काय आहे?

घरकाम करणाऱ्या महिलेवर प्रज्ज्वल रेवण्णा यांनी अत्याचार केल्याचा आरोप होता. सदर प्रकरण उघडकीस येईल, या भीतीमुळे माजी मंत्री एच. डी. रेवण्णा, त्यांची पत्नी भवानी रेवण्णा, सतीश बाबू यांच्यासह 9 जणांनी पीडितेचे अपहरण करून तिला खोलीत कोंडून ठेवले होते. याप्रकरणी गुन्हाही दाखल झाला होता. तसेच या प्रकरणात माजी मंत्री एच. डी. रेवण्णा आणि माजी खासदार प्रज्ज्वल रेवण्णा यांना अटक करण्यात आली होती. अलीकडेच न्यायालयाने रेवण्णा यांना जामीन मंजूर केला होता. तर भवानी रेवण्णा यांना अटकपूर्व जामीन मिळाला होता.

या प्रकरणाचा तपास करण्यासाठी सरकारने एसआयटी स्थापन केली होती. एसआयटीने पीडितेचे संरक्षण करून तिच्या जबाबाच्या आधारे चौकशी केली. तपासादरम्यान एसआयटीने 123 पुरावे गोळा केले होते. मागील वर्षाच्या अखेरीस न्यायालयात सुमारे 2,000 पानी आरोपपत्र सादर केले होते. प्रज्ज्वलच्या मोबाईलमध्ये पीडितेचे जबरदस्तीने लैंगिक शोषण करतानाचा व्हिडिओ आढळला होता. सदर व्हिडिओs या प्रकरणातील सर्वात मोठा पुरावा ठरला. फॉरेन्सिक लॅबमधील तपासणीतही सदर व्हिडीओतील व्यक्ती प्रज्ज्वलच असल्याचे सिद्ध झाले होते.

या प्रकरणासंदर्भात लोकसभा निवडणूक संपल्यानंतर 30 मे 2024 रोजी प्रज्ज्वल रेवण्णांना अटक करण्यात आली होती. 2019 मध्ये हासन मतदारसंघातून लोकसभेवर निवडून आलेल्या प्रज्ज्वल यांचा मागील वर्षी झालेल्या लोकसभा निवडणुकीत पराभव झाला होता.

... अन् अश्रू अनावर

न्यायालयाने निकाल जाहीर करताच माजी खासदार प्रज्ज्वल रेवण्णा न्यायालयात उपस्थित होते. दरम्यान, न्यायाधीशांनी अत्याचार प्रकरणात दोषी ठरवल्याचा निकाल देताच प्रज्ज्वल यांना अश्रू अनावर झाले. न्यायालयाबाहेर पडल्यानंतरही प्रज्ज्वल रेवण्णा यांचे अश्रू थांबले नाहीत.

Advertisement
Tags :

.