विदेशी लुटारुंचे गुणगान करणे देशद्रोह
मुख्यमंत्री योगी आदित्यनाथांचे वक्तव्य : नव्या भारताला हा प्रकार अस्वीकारार्ह
वृत्तसंस्था/बहराइच
महाराष्ट्रात औरंगजेबाची कब्र हटविण्याच्या मागणीवरुन सुरू असलेल्या वादादरम्यान उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी सनातन संस्कृतीला नष्ट करण्याचा प्रयत्न करणाऱ्या ऐतिहासिक व्यक्तींचे गुणगान करणाऱ्यांना इशारा दिला आहे. भारताच्या वारशावर हल्ला करणारे आणि येथील लोकांचा अपमान करणाऱ्या विदेशी लुटारूंचे गुणगान करणे देशद्रोहासमान आहे. हा प्रकार नवा भारत कदापिही सहन करणार नसल्याचे योगींनी म्हटले आहे. विदेशी लुटारूंचे गुणगान करण्याचा अर्थ देशद्रोहाच्या मूळांना मजबूत करणे आहे. आमच्या महान पूर्वजांचा अपमान करणाऱ्या आणि आमच्या संस्कृतीवर हल्ले करणाऱ्या, आमच्या महिलांचा अपमान करणाऱ्या लोकांचा नवा भारत कधीच स्वीकार करणार नाही, असे योगींनी बहाराइच येथे जाहीर सभेला संबोधित करताना म्हटले आहे.
पूर्ण जग भारताच्या समृद्ध वारशाला स्वीकारत असताना प्रत्येक नागरिकाने आमच्या महान नेत्यांबद्दल आदर राखणे हे त्याचे कर्तव्य आहे. तर आमची ओळख संपविण्याचा प्रयत्न करणाऱ्या लोकांची प्रशंसा केली जाऊ नये, असे योगींनी नमूद केले आहे. प्रयागराजमध्ये अलिकडेच पार पडलेला महाकुंभ हा आतापर्यंतचा सर्वात मोठा मानवी सोहळा असल्याचे उद्गार योगींनी काढले आहेत. जगात यापूर्वी कधीच एवढे भव्य आयोजन झाले नव्हते आणि कुठलाही देश या स्तरावर अशाप्रकारचे आयोजन करू शकत नाही. महाकुंभ भारताच्या सनातन संस्कृतीचा पुरावा आहे, जो भावी पिढ्यांना प्रेरित करणार असल्याचे योगींनी म्हटले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी अलिकडेच संसदेत बोलताना महाकुंभच्या आयोजनाचा उल्लेख करत उत्तरप्रदेश सरकारचे कौतुक केले होते.