प्राग मास्टर्स : प्रज्ञानंद - अरविंदचे अग्रस्थान कायम
वृत्तसंस्था/ प्राग
प्राग मास्टर्स बुद्धिबळ स्पर्धेच्या सहाव्या फेरीतील आपले सामने अनिर्णित राहिल्यानंतर ग्रँडमास्टर आर. प्रज्ञानंद आणि ग्रँडमास्टर अरविंद चिदंबरम यांनी संयुक्तपणे अव्वल स्थान कायम राखले आहे. प्रज्ञानंदला अमेरिकेच्या सॅम शँकलँडने बरोबरीत रोखले, तर अरविंदने व्हिएतनामच्या क्वांग लेइम लेसोबतचा सामना बरोबरीत सोडविला. यामुळे या दोघांचे प्रत्येकी चार गुण झाले आहेत. या दिवशी स्पर्धेत पहिल्यांदाच सर्व सामने अनिर्णित राहिले.
प्रज्ञानंद आणि अरविंद यांच्यानंतर अव्वल मानांकित चीनचा वेई यी, हॉलंडचा अनीश गिरी, जर्मनीचा व्हिन्सेंट कीमर आणि क्वांग लेइम यांचा क्रमांक लागतो, ज्यांच्याकडे प्रत्येकी तीन गुण आहेत. झेक जोडी गुयेन थाई दाई व्हॅन आणि डेव्हिड नवारा, तुर्कीचा गुरेल एडिझ आणि शँकलँड हे त्यांच्यापेक्षा अर्ध्या गुणाने मागे आहेत.
आणखी तीन फेऱ्या बाकी असताना प्रज्ञानंदचे पारडे अरविंदच्या तुलनेत थोडे जड दिसत आहे, कारण तो पुढील दोन सामने पांढऱ्या सोंगाट्यांसह खेळणार आहे. दुसरीकडे, अरविंदला फक्त एकाच सामन्यात पांढऱ्या सोंगाट्या घेऊन खेळण्याची संधी मिळणार आहे. सातवी फेरी प्रज्ञानंदसाठी महत्त्वाची ठरणार आहे, कारण तो त्यात वेई यीविऊद्ध खेळेल, तर अरविंदची गाठ अनीशशी पडेल. अनीशने आतापर्यंत त्याचे सर्व सामने बरोबरीत सोडविले आहेत.
पांढऱ्या सोंगाट्या घेऊन खेळणाऱ्या अमेरिकन प्रतिस्पर्ध्याविऊद्ध प्रज्ञानंद खेळाच्या मधल्या टप्प्यात काही काळ दबावाखाली आला होता. पण 43 चालींनंतर हा सामना अनिर्णित झाला. तर अरविंदचा सामना 32 चालींनंतर बरोबरीत सुटला. चॅलेंजर्स विभागात दिव्या देशमुखचे नशीब बदलले नाही. कारण तिला आणखी एक पराभव पत्करावा लागला आणि ती 10 खेळाडूंमध्ये शेवटच्या स्थानावर ढकलली गेली आहे. व्हॅक्लाव्ह फिनेलने दिव्याचा पराभव केला. भारतीय खेळाडूचा सध्या 1.5 गुण झालेला आहे. या गटात डेन्मार्कच्या जोनास बुहल बजेरेने फ्रान्सच्या मार्क’आंद्रिया मौरिझीला हरवून पुन्हा संयुक्तरीत्या आघाडीवर जाण्यात यश मिळविले आहे. तो उझबेकिस्तानच्या नोदिरबेक याकुबबोएव्हसह अव्वल स्थानावर आहे.