प्राग मास्टर्स : प्रज्ञानंद-अरविंद लढत बरोबरीत, अग्रस्थान कायम
वृत्तसंस्था/ प्राग
प्राग मास्टर्स बुद्धिबळ स्पर्धेच्या पाचव्या फेरीतील ग्रँडमास्टर आर. प्रज्ञानंद आणि सहकारी भारतीय अरविंद चिदंबरम यांच्यातील सामना बरोबरीत सुटला. त्यामुळे हे दोघेही खेळाडू जवळच्या प्रतिस्पर्ध्यांपेक्षा पूर्ण गुणांनी पुढे आणि अव्वल स्थानावर आहेत. अरविंद आणि प्रज्ञानंद यांच्या नावावर 3.5 गुण आहेत.
त्यांच्यानंतर चीनचा अव्वल मानांकित वेई यी, हॉलंडचा अनीश गिरी, व्हिएतनामचा क्वांग लेम ले आणि जर्मनीचा विन्सेंट कीमर यांचा क्रमांक लागतो. या सर्वांचे प्रत्येकी 2.5 गुण आहेत. उर्वरित चार स्पर्धक डेव्हिड नवारा आणि गुयेन थाई दाई व्हॅन, अमेरिकेचा सॅम शँकलँड आणि तुर्कीचा गुरेल एडिझ हे सहाव्या स्थानावर आहेत. 10 खेळाडूंच्या या राउंड-रॉबिन स्पर्धेत अजून चार फेऱ्या शिल्लक आहेत.
पाचव्या फेरीत फक्त एक निर्णायक सामना पाहायला मिळाला, ज्यामध्ये वेई यीने शँकलँडला हरवले. बाकीच्या सामन्यांत अनीश गिरीने दाई व्हॅनसोबत बरोबरी साधली, तर डेव्हिड नवाराने खूपच वाईट स्थितीतून पुनरागमन करून कीमरला रोखले, आणि ले याने गुरेल एडिझसोबतचा सामना बरोबरीत सोडविला. प्रज्ञानंद आणि अरविंद यांच्यातील हा तिसरा ‘क्लासिकल’ सामना होता. काळ्या रंगाच्या सोंगाट्या घेऊन खेळणाऱ्या अरविंदने प्रज्ञानंदला फारशा गुंतागुंतीच्या परिस्थितीत अडकविण्याचा प्रयत्न केला नाही.
चॅलेंजर्स विभागात दिव्या देशमुखला फ्रान्सच्या मार्क’आंद्रिया मौरिझीकडून स्पर्धेतील तिसरा पराभव पत्करावा लागला. तिचे 1.5 गुण झाले आहेत. या गटात उझबेकिस्तानचा नोदिरबेक याकुबबोएव्ह हा आघाडीवर असून त्याने झेक प्रजासत्ताकच्या जॅचिम नेमेचचा पराभव केला. उझबेक खेळाडूचे पाच सामन्यांतून चार गुण झाले आहेत.