प्रज्ञानंदची लढत बरोबरीत, सिंदारोव्हचा धडाका कायम
वृत्तसंस्था/ पाफोस, सायप्रस :
कँडिडेट्स स्पर्धेत सहभागी असलेला एकमेव भारतीय खेळाडू आर. प्रज्ञानदंने आंद्रे एसिपेन्कोसोबतचा सामना बरोबरीत सोडवला, तर जावोखिर सिंदारोव्हने आपली विजयी लय कायम ठेवत हिकारू नाकामुराला पराभूत केले आणि स्पर्धेच्या पाचव्या फेरीनंतर आपली पूर्ण गुणांची आघाडी कायम राखली.
हा आणखी एक नाट्यामय दिवस ठरला, कारण जिंकणे आवश्यक असलेल्या प्रज्ञानंदने एका अपारंपरिक सुऊवातीच्या चालीचा अवलंब केला. जरी मधल्या खेळात रोमांच अपेक्षित होता, तरी या भारतीय खेळाडूने कोणताही धोका न पत्करण्याचा निर्णय घेतला आणि केवळ 31 चालींमध्येच सामना बरोबरीत संपला. दुसरीकडे, सिंदारोव्ह एखाद्या ध्येयाने प्रेरित तऊण खेळाडूसारखा दिसला. कारण त्याने जागतिक क्रमवारीत दुसऱ्या क्रमांकावर असलेल्या हिकारू नाकामुराला सहज हरवून पहिल्या पाच फेऱ्यांमधून 4.5 गुण मिळवले आहेत.
मॅथियास ब्लूबामला पराभूत करून 3.5 गुणांवर पोहोचलेला अमेरिकेचा फॅबियानो काऊआना हा एकमेव खेळाडू आहे जो त्याच्या जवळ पोहोचला आहे. 2.5 गुणांसह प्रज्ञानंद यादीत अनिश गिरीसोबत पुढच्या स्थानावर आहे आणि त्याला आणखी दोन विजय मिळवण्याची गरज आहे. अनिशने वेई यीसोबतचा सामना बरोबरीत सोडवला. त्याच वेळी सुरू असलेल्या महिलांच्या स्पर्धेत दिव्या देशमुखने चीनच्या टॅन झोंगयीसोबत सामना बरोबरीत सोडवला, तर आर. वैशालीला दुसरी चिनी खेळाडू झू जिनरविऊद्ध अवघड स्थितीतून बाहेर सरण्यासाठी संघर्ष करावा लागला.
दरम्यान, युक्रेनची अॅना मुझीचुक रशियाच्या अलेक्झांड्रा गोर्याचकिनासोबतचा सामना बरोबरीत सोडवून संयुक्तपणे आघाडीवर कायम राहिली आहे, तर आदल्या दिवशी संयुक्तपणे आघाडीवर असलेली बिबिसारा असाउबायेव्हा रशियाच्या कॅटेरिना लॅग्नोकडून पराभूत झाली. लॅग्नो युक्रेनियन खेळाडूच्या बरोबरीने अव्वल स्थानी पोहोचली आहे.